पुणेः ११ जुले २००९ पूर्वी एम.फिल. पदवी धारण केलेल्या प्राध्यापकांना नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण करण्यापासून सूट मिळवण्यासाठीचे प्रस्ताव त्रुटींची पूर्तता करून उच्च शिक्षण संचालनालयास पुन्हा सादर करण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत या प्राध्यापकांचे प्रस्ताव त्रुटींची पूर्तता आणि अभिप्रायासह सादर केले नाही तर या प्राध्यापकांचे त्रांगडे होण्याची शक्यता आहे.
राज्यातील १२ विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयातील १ हजार ४४७ प्राध्यापक हे ११ जुलै २००९ पूर्वी एम. फिल. ही पदवी धारण केलेले आहेत. त्यांना नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबतचे प्रस्ताव उच्च शिक्षण संचालनालयामार्फत विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठवण्यात आले होते.
नेट-सेटमधून सूट देण्यासाठी पाठवण्यात आलेल्या १,४४७ प्राध्यापकांच्या प्रस्तावांची तपासणी करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. नेट-सेटमधून सूट मिळवण्यासाठी निर्धारित केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या १,४४७ जणांचे प्राध्यापकनिहाय प्रस्ताव संक्षिप्त माहितीस्तव विद्यापीठ अनुदान आयोगाकडे ६ सप्टेंबर २०२४ पूर्वी सादर करण्याबाबत राज्यातील १२ विद्यापीठांच्या कुलसचिवांना उच्च शिक्षण संचालनालयाने कळवले होते.
विद्यापीठांनी यूजीसीकडे सादर केलेल्या प्रस्तावांची तज्ज्ञ समितीमार्फत तपासणी करण्यात आली. या तपासणीत समितीला या प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्वयंस्पष्ट अभिप्रायांसह प्रकरणनिहाय त्रुटी आणि कागदपत्रांची पूर्तता करून हे प्रस्ताव उच्च शिक्षण संचालनालयास सादर करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२४ ची मुदत देण्यात आली आहे. राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी त्याबाबतचे पत्र राज्यातील १२ विद्यापीठांच्या कुलसचिवांना २३ डिसेंबर रोजी पाठवले आहे.