परीक्षेतील चारसौ बीसीः मुक्त विद्यापीठाच्या प्रमाद समितीसमोर डॉ. मझहर खान, आस्मा खानसह कोहिनूर महाविद्यालयाच्या दोन कर्मचाऱ्यांची उद्या झाडाझडती


नाशिकः कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मझहर खान आणि सचिव डॉ. आस्मा खान यांनी खुलताबादेतील कोहिनूर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम.ए. हिंदी विषयाचे पेपर सोडवून घेतल्याप्रकरणी मुक्त विद्यापीठाने स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय प्रमाद समितीने डॉ. मझहर खान आणि आस्मा खान यांच्यासह कोहिनूर महाविद्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना उद्या (२० मार्च) चौकशीसाठी बोलावले आहे.

खुलताबादेतील कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र आहे. या परीक्षा केंद्रावर १६ जानेवारी ते २१ जानेवारी या काळात एम.ए. हिंदी या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मझहर अन्वर खान आणि सचिव आस्मा मझहर खान हे एम.ए. हिंदीच्या प्रथम सत्राचे परीक्षार्थी होते.

डॉ. मझहर खान आणि आस्मा खान यांनी या परीक्षेत स्वतःचे पेपर स्वतः न सोडवता कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक फिरोज शेख आणि कार्यालयीन कर्मचारी बाळू भोपळे यांच्यावर दबाव टाकून त्यांच्याच हस्ताक्षरात सर्वच्या सर्व पेपर सोडवून घेतले होते.

हेही वाचाः कोहिनूरच्या अध्यक्षांची ‘चारसौ बीसी’: मुक्त विद्यापीठाच्या स्वतःच्याच परीक्षा केंद्रावर प्राध्यापकांवर दबाव टाकून सोडवून घेतले स्वतःचे एमए हिंदीचे पेपर!

स्वतःचेच महाविद्यालय, स्वतःचेच परीक्षा केंद्र आणि स्वतःच विद्यार्थी असलेले डॉ. मझहर खान आणि आस्मा खान यांनी बेकायदेशीरपणे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून त्यांच्याकडून त्यांच्याच हस्ताक्षरात सर्वच्या सर्व लेखी पेपर सोडवून घेतल्याचे वृत्त न्यूजटाऊनने ४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केल्यानंतर उच्च शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती.

हेही वाचाः कोहिनूर  महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर चारसौ बीसी: मुक्त विद्यापीठाने नेमली प्रकुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी समिती, सोमवारपासून झाडाझडती

याबाबत रिपाइंचे (आठवले) छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहर जिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्याकडे लेखी तक्रार केल्यानंतर मुक्त विद्यापीठाने प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली.

या चौकशी समितीने डॉ. मझहर खान, आस्मा खान यांच्यासह कोहिनूर महाविद्यालयातील शिक्षक फिरोज शेख आणि कार्यालयीन कर्मचारी बाळू भोपळे यांना चौकशीसाठी पाचारण केले होते. नैसर्गिक न्याय म्हणून या चौघांनाही त्यांचे म्हणणे मांडण्याची शेवटची संधी देण्यात आली असून उद्या (२० मार्च) दुपारी दोन वाजता मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक कार्यालयात प्रमाद समितीसमोर हजर राहून आपले म्हणणे मांडण्यास बजावण्यात आले आहे.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाने हडपले १ कोटी २५ लाख १८ हजार ८७८ रुपयांचे वेतन अनुदान, ‘काल्पनिक’ कार्यभार दाखवून केली मनमानी प्राध्यापक भरती?

प्रमाद समितीसमोर म्हणणे मांडण्यासाठी हजर राहताना हॉल तिकिट, ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असून उद्या जर या चौघांनीही प्रमाद समितीसमोर हजर राहून आपले म्हणणे मांडले नाही तर परीक्षेतील या गैरप्रकाराबाबत त्यांचे काहीही म्हणणे नाही, असे गृहित धरून एकतर्फी निर्णय घेण्यात येईल, असा इशारा प्रमाद समितीचे सदस्य सचिव डॉ. चंद्रकांत पवार यांनी या चौघांनाही १७ मार्च रोजी पाठवलेल्या नोटिशीत दिला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!