नागपूरः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? या योजनेसाठी नवीन निकष लावणार का? लाभार्थी लाडक्या बहिणींपैकी कोणाला अपात्र ठरवणार का? असे अनेक प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असतानाच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
ज्या लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत महायुतीवर भरभरून प्रेम दाखवले. त्यांच्या बँक खात्यात आम्ही हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करणार आहोत, असे फडणवीस म्हणाले.
लाडकी बहीण योजनेसाठी कोणतेही नवीन निकष लावलेले नाहीत. फक्त काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे लक्षात येत आहे. काहींनी चार-चार बँक खाती तयार करून फायदा घेतला आहे. समाजात जसे चांगल्या प्रवृत्तीचे लोक असतात, तसे काही वाईट प्रवृत्तीचे लोक असतात. त्यामुळे अशा लोकांनी फायदा घेऊ नये, याची आम्ही काळजी घेऊ. कारण हा जनतेचा पैसा आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मागच्या काळात आमच्या लक्षात आले की, पुरूषानेच ९ खाती काढून लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला. आता या पुरूषाला लाडकी बहीण म्हणायचे कसे? लाडका भाऊदेखील म्हणू शकत नाही. कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारणारा भाऊ लाडका असू शकत नाही, अशी टोलेबाजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
कोणीही कसलीही शंका मनात ठेवू नये. आम्ही जी-जी आश्वासने दिली होती, ज्या ज्या योजना सुरू केल्या आहेत, त्यातील कोणतीही योजना बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत महायुतीवर भरभरून प्रेम दाखवले, त्यांच्या बँक खात्यात आम्ही हे अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करणार आहोत, असे फडणवीस म्हणाले.