कुणी सांगितलं मी म्हातारा झालोय? तुम्ही काय बघितलंय? शरद पवारांची शेतकरी मेळाव्यात दिलखुलास फटकेबाजी!


पुणेः  वयाची ऐंशी पूर्ण केली आणि अनेक शारीरिक व्याधी असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यभर सातत्याने फिरत असतात. या वयातही शरद पवार यांच्यात इतका उत्साह येतो कुठून? हे राजकारण्यांसह राज्यातील जनतेला पडलेले कोडे आहे. तसाच उत्साह आणि जोश पवारांनी सोमवारी पुणे जिल्ह्यातील एका कार्यक्रमात दाखवला. ‘तुम्हाला कुणी सांगितलंय मी म्हातारा झालोय? तुम्ही काय बघितलंय?  मी काही म्हातारा-बितारा झालेलो नाही’, अशी तुफान फटकेबाजी पवार यांनी केली.

 शरद पवार हे सोमवारी पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. पुरंदरमधील परींचे गावात शेतकरी सन्मान मेळाव्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी साहेब आपले वय झाले आहे. एका जागेवर बसून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आदेश द्या, गावोगावी फिरू नका, असे काळजीपोटी एका शेतकऱ्याने शरद पवारांना म्हटले. या शेतकरी सन्मान मेळाव्यात बोलताना पवारांनी त्याचीच फिरकी घेतली. जेजुरीच्या सहकाऱ्यांनी सांगितले, बाहेर फिरू नका. त्यांना वाटते मी म्हातारा झालोय. कुणी सांगितलंय मी म्हातारा झालोय?  तुम्ही काय बघितलंय? मी म्हातारा-बितारा काही झालेलो नाही, असे शरद पवार म्हणाले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. शरद पवारही आपल्या या वक्तव्यावर मनमुरादपणे हसले.

केंद्र-राज्यातील भाजप सरकारवर निशाणाः या कार्यक्रमात बोलताना पवारांनी भाजपवर टिकास्त्र सोडले. ज्यांच्या हातात देशाची आणि राज्याची सूत्रे आहेत, त्यांनी ग्रामीण भागातील जनतेच्या हिताची जपणूक करण्यासाठी काही ठोस पावले टाकली पाहिजे. मात्र ती टाकण्याची त्यांची तयारी दिसत नाही. निर्णय घ्यायला ते तयार नाहीत. १९७८ मध्ये मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा खेड्यापाड्यात मोठा दुष्काळ होता. तेव्हा पंधरा दिवसांत मी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. माझ्याकडे केंद्राची जबाबदारी आली, तेव्हा मी तीन महिन्यांत शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटींचे कर्ज माफ केले, असा दाखला देत शरद पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला.

लबाडाच्या घरचे आवतण…. भूविकास बँकेच्या कर्जमाफीबाबत एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारने केलेला दावा पूर्णतः विसंगत आणि फसवा असल्याचा आरोप शरद पवारांनी केला. आम्ही शेतकऱ्यांचे भू विकास बँकेचे कर्ज माफ केले, असे राज्य सरकारकडून सांगितले जाते. पण मला येथे बसलेल्या लोकांनी सांगावे की, गेल्या दहा वर्षांत किमान एका तरी शेतकऱ्याला भू विकास बँकेचे कर्ज मिळाले आहे का? भू विकास बँक अस्तित्वात आहे, ही गोष्ट तरी तुम्हाला माहिती आहे का?  भू विकास बँक एकेकाळी होती, पण ती आता राज्यात कार्यरत नाही. आता भू विकास बँकेचे नावही कुणाला माहीत नाही. गेल्या २५-३० वर्षांपासून भू विकास बँकेने दिलेल्या कर्जाची वसुलीच झालेली नाही. ही वसुली होणार नाही, हे कळल्यावर राज्यसरकारने आम्ही शेतकऱ्यांचे भू विकास बँकेचे कर्ज माफ करत आहोत, अशी घोषणा केली. लबाडाच्या घरचं आवतण जेवल्याशिवाय खरं नसतं, असाच हा एकंदर प्रकार असल्याचे शरद पवार म्हणाले.

कोकणचे लोक १६ वर्षे वय झाले की…. मी केंद्रीय कृषी मंत्री असताना देशात फळबाग योजना आणली.  या योजनेअंतर्गत फळबाग घेण्यासाठी आर्थिक सहाय्य केले. आता कोकणात गेलात तर काजू आणि हापूस अंब्याचे हजारो एकर क्षेत्र आहे. एकेकाळी कोकणचे लोक १६ वर्षे वय झाले की मुंबईला कामासाठी जायचे. ६० वर्षे वय झाले की गावाकडे माघारी यायचे. आज मात्र कोकणातल्या लोकांची मुंबईला जायची भूमिका नाही. फळबाग योजनेतून जास्तीत जास्त आंबा, फणस, काजू कसा लावता येईल, यासाठी ते प्रयत्न करतात, असेही शरद पवार म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *