नागपूरः परभणी येथील तरूण भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परभणी पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी परभणीत आंबेडकरी अनुयायांवरील पोलिसी अत्याचाराचे व्हिडीओ काढले म्हणून पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना अमानुष मारहाण केली का?, सोमनाथ सूर्यवंशींचा जीव जाईपर्यंत मारहाण करण्याचे आदेश कोणी दिले? असे सवाल केले आहेत.
विजय वडेट्टीवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉलिंग सोशल मीडियावर पोस्ट करून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. परभणी प्रकरणातील मृत भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिसांनी केलेली ही हत्या आहे का? सूर्यवंशी यांच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे शवविच्छेद अहवालात पुढे आले आहे. एखाद्याचा जीव जावा इतकी मारहाण पोलिसांनी का केली? पोलिसांना मारहाण करण्याचे आदेश कोणी दिले होते? पोलिसांना काय लपवायचे होते? असे सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केले आहेत.
अहवालात सोमनाथ सूर्यवंशी यांना अनेक जखमा झाल्याचा उल्लेख आहे आणि पोलिस सांगत होते हार्ट अटॅक आला? यावरून पोलिसांच्या हेतूवरच प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिस आंबेडकरी जनतेवर बळाचा वापर करत होते, मारहाण करत होते याचे व्हिडीओ सूर्यवंशी यांनी काढले हा राग पकडून पोलिसांनी सूर्यवंशी यांना अमानुष मारहाण केली का? , असा सवालही वडेट्टीवार यांनी केला आहे.
सोमनाथ सूर्यवंसी यांचा हा मृत्यू नाही तर पोलिसांनी केलेली हत्या आहे का, असा प्रश्न आज निर्माण होत आहे. या प्रकरणी जबाबदार पोलिस अधिकारी निलंबित झालेच पाहिजे, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे.
सरकारने भूमिक का घेतली नाही?: आव्हाडांचा सवाल
सोमनाथ सूर्यवंशी या तरूणास बेदम मारहाण झाली. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला, असा पोस्टमार्टेम अहवाल रूग्णालयाने दिला आहे. हा अहवाल हातात आल्यानंतर लगेचच कारवाई करणे गरजेचे असताना सरकारने भूमिका घेतली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
परभणी येथील आंबेडकरी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केली. या मारहाणीत कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरूणाचा मृत्यू झाला. सोमनाथ यास बेदम मारहाण झाली. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल रुग्णालयाने दिला आहे. हा अहवाल हातात आल्यानंतर लगेचच कारवाई करणे गरजेचे होते. मात्र सरकारने भूमिका घेतली नाही. सरकारने संबंधित पोलिस अधीक्षक, संबंधित पोलिस उपअधीक्षक, पोलिस अधिकारी, ठाणे अंमलदार आणि त्या पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही डॉ. आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करून केली आहे.