मुंबईः नोव्हेंबर महिन्यात थंडीने जोर धरण्यास सुरूवात केली असतानाच फेंगल चक्रीवादळामुळे डिसेंबर महिन्यात हवामानात लक्षणीय बदल झाला आणि थंडी गायब झाली आहे. अशातच आता हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसणार असल्याचा इशारा दिला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात बदल झालेला पहायला मिळत आहे. फेंगल चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यात ७ डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
हवामान विभागाने राज्यातील काही भागात पावसाचा इशाराही दिला आहे. सोलापूर, दक्षिण मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात हलका ते किरकोळ पाऊस होण्याची शक्यता आहे.
आज कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्राच्या काही भागातही आज पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. सातारा घाट तसेच पुणे जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.