
नवी दिल्लीः राज्याच्या बहुतांश भागात सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली असतानाच भारतीय हवामान विभागाने चिंताग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. २४ ते ३१ जुलैदरम्यान मध्य भारतासह महाराष्ट्राच्या काही भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेष म्हणजे ३१ जुलै ते ७ ऑगस्ट या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाचा जोर सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
सध्या पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे तापमानातही वाढ झाली आहे. राज्यातील शेती, पिकांची स्थिती आणि पाणीसाठा लक्षात घेता येत्या काही दिवसांत पावसाची नितांत आवश्यकता आहे. आतापर्यंत राज्याच्या काही भागातच समाधानकारक पाऊस झाला आहे. उर्वरित भागाला अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे हवामान विभागाचा हा अंदाज शेतकऱ्यांना दिलासादायक ठरणारा आहे.
राज्याच्या बहुतांश भागात सोमवारपर्यंत पावसाचा फारसा जोर नसेल. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसतील. मात्र सोमवारनंतर राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर उर्वरित भागात हलक्या सरींची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ३१ जुलै ते ७ ऑगस्ट या काळात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. विशेषतः पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नांदेड, लातूर, बीड आणि परभणी या भागात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. आजपासून(१९ जुलै) ते २५ जुलैपर्यंत मराठवाडा, आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
रविवार (२० जुलै), सोमवार आणि मंगळवारी मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच अहिल्यानगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदूरबार आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची जोर अधिक राहील. मंगळवार आणि बुधवारी विदर्भातील काही जिल्ह्यांत तसेच मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
३१ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, अहिल्यानगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदूरबार आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
राज्याच्या बहुतांश भागात शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. उगवण होऊन वाढीस लागलेल्या पिकांना सध्या पावसाची प्रतीक्षा आहे. पिकांसाठी आवश्यक असलेला पुढील टप्प्यातील पाऊस वेळेत मिळाला तरच पिके तग धरू शकतील, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत असतानाच हवामान विभागाने वर्तवलेला हा अंदाज त्यांची चिंता काही अंशी दूर करण्यास मदत ठरू पाहणारा आहे.