
नवी दिल्लीः यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिल ते जूनदरम्यान उन्हाळा कडक रहाणार असून पश्चिम तसेच पूर्व भारताचा काही भाग वगळता देशातील अधिकांश भागात नेहमीपेक्षा जास्त तापमान राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशाराही देण्यात आला आहे. यंदा १० ते १२ दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
एप्रिल ते जूनदरम्यान उत्तर तसेच पूर्वेकडील भाग, मध्य भारत आणि वायव्य भारतातील सपाट भागात उष्णतेची लाट नेहमीपेक्षा अधिक तीव्र असेल. ही उष्णतेची लाट दोन-तीन दिवसांनी वाढण्याची शक्यता आहे. सामान्यपणे भारतात एप्रिल ते जूनदरम्यान उष्णतेची लाट चार ते सात दिवस असते, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे प्रमुख मृत्यूंजय महापात्रा यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.
ज्या राज्यांमध्ये उष्णतेची लाट नेहमीपेक्षा जास्त दिवस रहाण्याची शक्यता आहे, त्या राज्यांत महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक ही राज्ये आणि तामिळनाडूच्या उत्तर भागाचा समावेश आहे. या भागात नेहमीच पाच ते सहा दिवस उष्णतेची लाट असते. परंतु यंदा उष्णतेची लाट १० ते १२ दिवस रहाण्याची शक्यता आहे.
एप्रिलमध्ये भारतातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यापेक्षा जास्त रहाण्याचा अंदाज आहे. उत्तर-पश्चिम आणि ईशान्येकडील काही ठिकाणे वगळता देशातील बहुतांश भागात किमान तापमान सामान्यापेक्षा जास्त असेल. उन्हाळ्यात साधारणपणे पाच ते सहा दिवस उष्णतेच्या लाटा येतात. परंतु यावेळी उष्णतेच्या लाटांची संख्या दुप्पट होऊ शकते, असे महापात्रा म्हणाले.