पुणेः अवकाळी पावसाच्या माऱ्याने राज्यातील शेतकरी आधीच मेटाकुटीला आलेला असताना भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्याच्या विविध जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मूसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
भरउन्हाळ्यात महाराष्ट्रभर अवकाळी पावसाने कहर केला आहे. अवकाळी पावसाच्या माऱ्यामुळे विदर्भ-मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात केवळ शेतकऱ्यांचेच नाही तर सर्वसामान्य माणसांचेही मोठे नुकसान केले आहे. त्यातच आता पुढील पाच दिवस विविध जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मूसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), लातूर, जालना, बीडला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव(उस्मानाबाद), नांदेड, लातूर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबारला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यात आज( २९ एप्रिल) मूसळधार पावसाचा अंदाज आहे. अकोला, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील उर्वरित जिल्हे, विदर्भ, आणि छत्रपती संभाजीनगर वगळता सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. उद्या ३० एप्रिलला नागपूर, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
वादळी वारा सुटला तर काय करावे?
वादळी वारा आणि विजा चमकत असताना घराच्या दारे-खिडक्या बंद ठेवाव्यात. घराबाहेर असल्यास त्वरित सुरक्षित निवाऱ्याच्या ठिकाणी आणि मजबूत इमारतीमध्ये आश्रय घ्यावा. घराबाहेर असल्यास ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल यांच्यापासून दूर रहावे.
उघड्या जागेवर असल्यास शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व डोके दोन्ही गुडघ्यामध्ये घ्यावे. मोकळ्या तसेच लटकत्या तारांपासून दूर रहावे. वादळी वाऱ्याच्या स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये.