नवी दिल्लीः केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२२ चा अंतिम निकाल मंगळवारी दुपारी जाहीर केला. त्यात इशिता किशोरने देशात पहिला क्रमांक पटकावला तर ठाण्याची कश्मिरा संखे देशात २५ वी रँक मिळवत महाराष्ट्रातून पहिली आली आहे. विशेष म्हणजे नागरी सेवा परीक्षेच्या या निकालात मुलींचाच डंका असून पहिल्या दहा रँकधारकांमध्ये तब्बल सहा मुली आणि चार मुले आहेत.
यूपीएसएसीने भारतीय प्रशासन सेवा (IAS), भारतीय परकीय सेवा (IFS), भारतीय पोलिस सेवा (IPS), केंद्रीय सेवा गट अ, गट ब अशा पदांसाठी नागरी सेवा परीक्षा २०२२ घेतली होती. या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या निकालात पहिल्या दहा रँकमध्ये सहा मुली असून त्यात इशिता किशोर, गरिमा लोहिया, उमा बरती एन., स्मृती मिश्रा, गहना नव्या जेम्स, कनिका गोयल या सहा मुली तर मयूर हजारिका, वसीम अहमद भट, अनिरूद्ध यादव, राहुल श्रीवास्तव हे चार मुले आहेत.
या निकालात महाराष्ट्रातील आठ उमेदवारांनी झेंडा फडकवला आहे. ठाण्याची कश्मिरा संखे हिने देशात २५ वा रँक मिळवला आहे. ती महाराष्ट्रातून प्रथम आली आहे. अन्य उमेदवारांमध्ये वसंत दाभोळकर (१२७ वा रँक), गौरव कायंदे पाटील (१४६ वा रँक), ऋषिकेश शिंदे (१८३ वा रँक), अभिषेक दुधाळ (२८७ वा रँक), शुतिषा पाताडे (२८१ वा रँक), स्वप्नील पवार (२८७ वा रँक) यांचा समावेश आहे.
पहिल्या दोन प्रयत्नांत प्रिलिमही पास झाली नव्हती कश्मिरा!
महाराष्ट्रातून प्रथम आलेली कश्मिरा संखेने या यशाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. लहानपणापासून मी यूपीएससीचे स्वप्न पाहिले होते. माझी आई मला किरण बेदींच्या बातम्यांची कात्रणे दाखवायची. तेव्हापासून नागरी सेवा परीक्षांची तयारी करण्याचा विचार होता. माझे पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले. मी मुंबईतील शासकीय डेंटल कॉलेजमधून डेंटल सर्जरीमध्ये पदवी घेतली. पुढे डेंटिस्ट म्हणून काम करत असताना वाटले की, मी नागरिकांच्या आरोग्य काम करते आहे, मात्र नागरी सेवेतून मी मोठ्या प्रमाणात काम करू शकते. तेव्हापासूनचा निश्चिय आताही ठाम आहे, असे कश्मिरा संखे म्हणाली.
मी २०२० पासून या परीक्षेसाठी तयारी सुरू केली. हा माझा तिसरा प्रयत्न होता. मागील दोन प्रयत्नांत मी प्रिलिम परीक्षाही उत्तीर्ण होऊ शकले नव्हते. यावेळी सर्वच पातळ्यांवर यश मिळाले. माझे पहिले प्राधान्य आयएएस आहे, दुसरे प्राधान्य आयएएफ आहे, असे कश्मिरा म्हणाली.
देशात दुसऱ्या आलेल्या गरिमाने ना कोचिंग लावले, ना….
यूपीएससी परीक्षेत देशात दुसरी आलेल्या गरिमा लोहियाच्या यशाची कथा प्रेरक आहे. आपला पाल्य नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण व्हावा म्हणून अनेक पालक मुलांच्या खासगी शिकवण्यांवर लाखो रुपये खर्च करतात. परंतु गरिमा लोहियाने घरीच अभ्यास करून या परीक्षेची तयारी केली आणि ती देशात दुसरी आली. मी काहीतरी करून दाखवण्याचा निर्धार केला होता. आपल्या वाटेत कितीही अडथळे आले तरी थांबायचे नाही, असे मी ठरवले होते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मी केवळ पुस्तकांची मदत घेतली. ज्या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती, त्यासाठी गुगलची मदत घेतली, असे गरिमा म्हणाली.
गरिमाला पहिल्या प्रयत्नांतच ही परीक्षा उत्तीर्ण व्हायची होती. परंतु तिला यश मिळाले नाही. पहिला प्रयत्न अपयशी ठरल्याने तिने दुसरा प्रयत्न करायचे ठरवले आणि या प्रयत्नांत ती यशस्वी झाली. दोन्ही परीक्षांच्या वेळी तिला विश्वास होता की ती ही परीक्षा उत्तीर्ण होईल. परंतु पहिल्या प्रयत्नांत ती काही गुणांनी मागे पडली होती.