धक्कादायक! विद्यापीठाच्या जलतरण तलावात अप्रशिक्षित भोंदू योगीबाबाच मुलींना द्यायचा पोहण्याचेही धडे, प्रशिक्षित कोच मात्र परागंदा!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागात अनधिकृतपणे योगवर्ग चालवून विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणाऱ्या भोंदू योगीबाबाचे अनेक धक्कादायक कारनामे समोर येत आहेत. क्रीडा संचालक डॉ. संदीप जगताप आणि जलतरण प्रशिक्षक किरण शूरकांबळे यांनी विद्यापीठाचा जलतरण तलावच या भोंदू योगीबाबाच्या हवाली करून टाकला होता आणि पोहण्याचे प्रशिक्षण देण्याचे कुठलेही प्रशिक्षण नसलेला हा भोंदू बाबा मुलींना जलतरणाचे धडे द्यायचा, अशी धक्कादायक माहिती न्यूजटाऊनच्या हाती आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागात बाबाजी नावाने ओळखला जाणारा भोंदू योगीबाबा अनधिकृतपणे योगाचे वर्ग चालवत होता. क्रीडा संचालक डॉ. संदीप जगताप आणि जलतरण प्रशिक्षक किरण शूरकांबळे या दोघांनी विद्यापीठ प्रशासनाला अंधार ठेवून संगनमताने परस्पर या भोंदू योगीबाबाला विद्यापीठात योगाचे वर्ग घेण्याची परवानगी दिली होती.

हेही वाचाः विद्यापीठ ‘योगी बाबा’च्या वेगळ्याच’ क्रीडा’; योगवर्गात विद्यार्थिनींशी गैरवर्तन, ‘मी काय तुमचा नवरा आहे का?’ म्हणत अश्लील भाषेत पाणउतारा!

हा भोंदू योगीबाबा योगवर्गाला आलेल्या विद्यार्थिनींशी गैरवर्तन करत होता. ‘तुमचे नखरे झेलायला मी काय तुमचा नवरा आहे का?’ अशी अर्वाच्च भाषा वापरून विद्यार्थिनींचा पाणउतारा करत होता. न्यूजटाऊनने या भोंदू बाबाचा पर्दाफाश केल्यानंतर त्याची विद्यापीठातील योगवर्गाची दुकानदारी बंद करण्यात आली आहे. मात्र या भोंदू बाबाचे कारनामे धक्कादायक कारनामे आता उघड होऊ लागले आहेत.

किरण शूरकांबळे हे विद्यापीठाचे पगारी जलतरण प्रशिक्षक आहेत. परंतु शूरकांबळे आणि जगताप या दोघांनी विद्यापीठाचा जलतरण तलावच या भोंदू बाबाच्या हवाली करून टाकला होता. पोहणे शिकवण्याचे कुठलेही अधिकृत प्रशिक्षण नसलेला हा भोंदूबाबा जलतरण तलावात उतरून मुलींना पोहणे शिकवायचा. त्यावेळी विद्यापीठाचे अधिकृत जलतरण प्रशिक्षक किरण शूरकांबळे मात्र गायब असायचे. तेथे लाईफ गार्डही नसायचे. या भोंदू योगीबाबाच्या हवाली किल्ल्याही करून टाकण्यात आल्या होत्या. अनेकवेळा तोच कुलुपे लावून निघून जायचा.

हेही वाचाः न्यूजटाऊन इम्पॅक्ट: विद्यापीठातील ‘त्या’ भोंदू योगी बाबाची दुकानदारी बंद, आता क्रीडा संचालक डॉ. जगताप, कोच शूरकांबळे कारवाईच्या फेऱ्यात

धक्कादायक बाब म्हणजे हा भोंदूबाबा मुलींना पाण्यावर बसायला शिकवतो म्हणून त्यांच्याशी शारीरिक लगटही करायचा. हा सगळा धक्कादायक प्रकार दिवसाढवळ्या सुरू असताना विद्यापीठ प्रशासनाला मात्र त्याची खबरही लागली नाही. त्यामुळे डॉ. जगताप आणि शूरकांबळे यांनी संगनमताने सुरू केलेला भोंदू योगीबाबाचा खेळ गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरूच राहिला.

काही वर्षांपूर्वी एमजीएम संस्थेच्या आवारातील जलतरण तलावात बुडून तरूण व्यापाऱ्याचा मृत्यू झाला होता. तेथे प्रशिक्षित लाईफ गार्ड असूनही ही दुर्घटना घडली होती. असे असतानाही विद्यापीठाच्या जलतरण तलावात पोहणे शिकवण्याचे कुठलेही अधिकृत प्रशिक्षण नसलेल्या खासागी व्यक्तीला मुलींना जलतरणाचे धडे देण्याची परवानगी कशी काय देण्यात आली? हा प्रश्नच आहे.

भोंदू बाबा देत असलेले भाडे कोणाच्या खिशात?

न्यूजटाऊनने या भोंदू योगीबाबाच्या कारनाम्याचा पर्दाफाश केल्यानंतर प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांनी क्रीडा संचालक डॉ. संदीप जगताप यांना फैलावर घेत त्यांच्याकडे या सगळ्या प्रकाराबाबत विचारणा केली. तेव्हा हा भोंदू योगीबाबा विनामूल्य योग शिकवतो म्हणाला म्हणून आम्ही त्याला परवानगी दिली होती, असे त्यांना सांगण्यात आले.

परंतु हा भोंदू बाबा क्रीडा विभागाच्या हॉलमध्ये योगवर्ग घेण्यासाठी भाडे द्यायचा. त्याच्या गैरवर्तनावर विद्यार्थिनींनी आक्षेप घेतल्यानंतर मी भाडे भरतो, त्यामुळे माझे कुणीच वाकडे करू शकत नाही, असे त्यानेच सांगितले. मग हा भोंदू बाबा जर क्रीडा विभागात योगवर्ग घेण्याचे भाडे भरत होता, तर ते भाडे नेमके कोणाच्या खिशात जात होते? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!