मुंबईः राज्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचा मोठा फटका बसला आहे. राज्याच्या आठपेक्षा अधिक जिल्ह्यांतील सुमारे १३ हजार ५०० हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीतील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्य सरकारने तातडीने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून प्रत्यक्ष पंचनाम्यांनंतर नुकसानग्रस्त शेतजमिनीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
ठाणे, पालघरसह राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशिम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. अहमदनगर, नंदूरबार, धुळे, जळगाव, पुणे, जालना या जिल्ह्यातही अवकाळी पाऊस व गारपीटीने शेतकऱ्यांना फटका दिला आहे.
रब्बी हंगामातील पिके काढणीला आलेली असतानाच राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे सुमारे १३ हजार ५०० हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आढावे आणि प्रत्यक्ष पंचनामे केल्यानंतर नुकसानीची प्रत्यक्ष वस्तुस्थिती समोर येणार आहे.
आधीच कांद्याचे भाव पडल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना अवकाळी पाऊस आणि गारपीटीचे संकट आले. त्यामुळे रब्बीची पिके आणि बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले. सध्या शेतीतील कांदा, हरभरा, गहू ही पिके काढणीला आलेली आहेत. हातातोंडाशी आलेल्या पिकांची नासाडी झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. सरकार संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
तातडीने नुकसान भरपाई द्या- अजित पवारः राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या मुद्दा आज लावून धरला. राज्यात विविध भागात अवकाळी पाऊस, गारपिटीने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी विधानसभेत केली.
गेल्या दोन दिवसात नाशिक, धुळे, बुलडाणा, पालघर, बीड, जालना, पुणे, अहमदनगर, वाशिम, सोलापूर व राज्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापणीला आलेला गहू जमिनदोस्त झाला आहे, आंबा, काजू, द्राक्षे, केळी, संत्रा, लिंबू, पपई, कलिंगड यासारख्या अनेक फळपीकांबरोबरच हरभरा, तूर, मका, वाल, चवळी, पावटा व इतर रब्बी पालेभाज्या यांचेही नुकसान झाले आहे, अजित पवार म्हणाले.
वीज अंगावर पडून जनावरे दगावली आहेत, मेंढ्यासुद्धा मृत पडल्या आहेत. शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे. आंबा, काजू सारख्या पिकांचा मोहोर व संत्रा, लिंबू यांची फळे गळल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे, असेही पवार म्हणाले.
दरम्यान, मुंबई, ठाण्यासह उत्तर-मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असल्याने बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.