
नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) दोन टक्के वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी मंजुरी दिली. आठव्या वेतन आयोगाची वाट पहात असतानाच त्याआधीच महागाई भत्त्यात वाढ करण्यात आल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. या दोन टक्के महागाई भत्ता वाढीमुळे आता महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५५ टक्के होईल.
यापूर्वी केंद्र सरकारने जुलै २०२४ मध्ये महागाई भत्त्यात वाढ केली होती. त्यावेळी महागाई भत्ता ५० टक्क्यांवरून ५३ टक्के करण्यात आला होता. आज महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ करण्यात आल्यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आता ५५ टक्के महागाई भत्ता मिळेल. इकॉनॉमिक्स टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यात येतो. कर्मचाऱ्यांचे पगार राहणीमानाच्या वाढत्या खर्चाशी सुसंगत रहावेत, यासाठी हा महागाई भत्ता दिला जातो. सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार दर दहा वर्षांनी वेतन आयोगामार्फत निश्चित केला जातो. परंतु कर्मचाऱ्यांना महागाईचा सामना करता यावा म्हणून वेळोवेळी महागाई भत्त्याचे समायोजन सुनिश्चित केले जाते.
केंद्रीय मंत्रिमंडळाने आज महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याचा लाभ कार्यरत सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक आणि पेन्शनधारकानंतर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना होणार आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार दिले जातात. त्यांना आता आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी येण्याची शक्यता आहे.