आज आणि उद्या समृद्धी महामार्गावर जालना ते संभाजीनगरदरम्यान दोन्ही बाजूंची वाहतूक ‘या’वेळेत बंद, असा असेल पर्यायी मार्ग


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन अतिउच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतूक मंगळवार, २१ नोव्हेंबर व  बुधवार २२ नोव्हेंबर असे दोन दिवस दुपारी १२ ते ४ यावेळात बंद असेल. उर्वरित कालावधीत वाहतूक सुरळीत सुरु राहील. बंद कालावधीत पर्यायी मार्गावरुन वाहतुक वळवण्यात आली आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी कळवले आहे.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. हे काम मंगळवार २१ नोव्हेंबर व बुधवार २२ नोव्हेंबर, असे दोन दिवस दुपारी १२ ते ४ यावेळात होणार आहे.

हे दोन्ही दिवस काम सुरु असलेल्या कालावधीत म्हणजेच दुपारी १२ ते ४ यावेळेत जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान समृद्धी महामार्गावरील जालना इंटरचेंज (आयसी-१४) ते सावंगी इंटरचेंज (आयसी-१६) दरम्यान नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक निधोना (जालना) इंटरचेंज आयसी-१४ मधून बाहेर पडून निधोना एमआयडीसी मार्गे-राष्ट्रीय महामार्ग ७५३ ए (जालना-छत्रपती संभाजीनगर) मार्गे केंब्रीज शाळेपर्यंत नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज क्र. आयसी-१६ (छत्रपती संभाजीनगर) येथे समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन शिर्डीकडे रवाना होईल.

समृद्धी महामार्गावरील शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक, सावंगी इंटरचेंज क्र. आयसी-१६ (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडून वर नमूद केलेल्या मार्गावरुन (विरुद्ध दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज क्र. आयसी-१४ या ठिकाणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन नागपूरकडे रवाना होईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक यांनी कळवले आहे. उर्वरीत कालावधीत वाहतूक सुरळीत सुरु राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *