
मुंबई: राज्याच्या काही भागांत १७ ते २० मार्चदरम्यान प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज असून काही ठिकाणी गारपीटीचीही शक्यता असल्याचे मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने म्हटले आहे.
सध्याच्या अंदाजानुसार प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खान्देश तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागात विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही भागात गारपिटीची शक्यता असल्याचेही हवामान केंद्राने म्हटले आहे. १८ ते २० मार्चदरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
एकीकडे विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा अंदाज असतानाच दुसरीकडे मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यात आज १३ मार्च आणि उद्या १४ मार्च रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यातही आज उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या एप्रिल आणि मे महिन्यातील हवामान नेहमीपेक्षा अधिक उष्ण असणार आहे.
शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
