
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पैठण तालुक्यातील पाचोड येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा मतदान केंद्रावर शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे यांच्या अल्पवयीन मुलाच्या बोटाला शाई लावल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मतदान केंद्रावरील तीन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात आले. या मतदानाच्या दिवशी शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे हे मतदानासाठी आपल्या अल्पवयीन मुलासह पाचोड येथील मतदान केंद्रावर पोहोचले. आ. भुमरे यांच्याबरोबरच त्यांच्या अल्पवयीन मुलालाही मतदान केंद्रावर प्रवेश दिल्यानंतर त्याच्या बोटाला मतदान केल्याची शाई लावल्यामुळे टिकेची झोड उठली होती. त्याच प्रकरणात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे.
निवडणुकीसारख्या अतिसंवेदनशील कामकाजात बेजाबदारपणा व हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्यामुळे पाचोड मतदान केंद्राचे प्रमुख दिलीप देवराव नरवाडे (सहायक शिक्षक, संत एकनाथ हायस्कूल चितेगाव, ता. पैठण) यांच्यासह मतदान अधिकारी संगीता नामदेव केदार (सहायक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कल्याणनगर, पाचोड) आणि पाचोड पोलिस ठाण्याच्या पैठण पथकाच्या होमगार्ड रेणुका सुरेश बोंबले यांना निलंबित करण्यात आले आहे.
मतदानाच्या दिवशी आ. विलास भुमरे यांना लहान मुलासोबत मतदान कक्षात प्रवेश करू दिल्यामुळे मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त) नियमातील विविध कलमांन्वये या कर्मचाऱ्यांवर सेवेतून तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश पैठणच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास देण्यात आले आहेत.
