मुंबईः राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आज सकाळपासून सुरूवात होणार आहे. तीन चालणाऱ्या या विशेष अधिवेशनात आमदारांचे शपथविधी आणि विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम रविवारी सुटीच्या दिवशीही सुरू राहणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी गुरूवारी शपथ घेतल्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत घेण्याचा प्रस्ताव राज्यपाल के. सी. राधाकृष्णन यांच्याकडे पाठवण्यात आला होता. तो मान्य करण्यात आला आहे.
या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचे शपथविधी, राज्यपालांचे अभिभाषण आणि विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. आज सकाळी ११ वाजता विधानसभेच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर आमदारांचे शपथविधी सुरू होतील. शनिवार आणि रविवारी दिवसभर शपथविधी चालतील. सोमवारी राज्यपालांचे अभिभाषण आणि नव्या विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल.
विधान परिषदेची बैठक ९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. या दिवशी विधान परिषदेच्या अध्यक्षांचीही निवडणूक होण्याची शक्यता आहे. दोन वर्षे, तीन महिने उलटले तरी विधान परिषदेचे अध्यक्षपद रिक्त आहे. महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात विधान परिषद अध्यक्षपदाची निवडणूक झाली नाही. त्यामुळे ९ डिसेंबर रोजीच्या बैठकीत विधान परिषद अध्यक्षांची निवडणूक होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.