मुंबईः अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ आणि दरमहा निवृत्तीवेतन देण्याच्या मागणीबरोबरच अन्य प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने ४ डिसेंबरपासून महाराष्ट्रव्यापी बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे. ठाण्यात आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चाने जाऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री कार्यालयाला या संपाची नोटीस दिली.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करा, निवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्तीवेतन द्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नवीन मोबाइल द्या, पोषण आहाराच्या रकमेत वाढ करा या प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ४ डिसेंबरपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे.
अंगणवाडी कर्मचारी ग्रॅच्युईटी मिळण्यास पात्र आहेत, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. परंतु दोन वर्षे उलटून गेली तरी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही.
निवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा अर्ध्या मानधनाएवढी रक्कम निवृत्तीवेतन म्हणून देण्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे. परंतु या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.
अंगणवाडी केंद्रातील बालकांना पूरक पोषण आहारासाठी देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करावी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाइल देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने चार महिन्यांपूर्वी दिला. परंतु राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अद्याप मोबाइल दिलेला नाही. या मागण्यांसाठी राज्यातील २ लाख अंगणवाडी कर्मचारी ४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.
या संपाची नोटीस ठाणे येथील मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यासाठी शुक्रवारी ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने आले आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री कार्यालयाला या संपाची नोटीस दिली.