नवी दिल्लीः भारतीय रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केल्यानंतर या नोटा बदलून देण्याबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. २३ मेपासून देशातील सर्व बँकांच्या शाखेत २ हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याचे काम सुरू होणार आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) २ हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यासाठी महत्वाची नियमावली जाहीर केली आहे.
एसबीआयने जारी केलेल्या नियमावलीनुसार २ हजार रुपयांच्या नोटा एकावेळी फक्त २० हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंतच बदलून घेण्याची सुविधा उपलब्ध असेल. यासाठी कोणताही फॉर्म किंवा स्लिप भरून देण्याची गरज असणार नाही. या नियमावलीनुसार नागरिक एसबीआयच्या कोणत्याही शाखेत जाऊन एकावेळी २ हजार रुपयांच्या १० नोटा बदलून घेऊ शकतील.
२३ मेपासून तुम्ही एसबीआयच्या कोणत्याही शाखेत कोणताही फॉर्म अथवा स्लिप न भरता किंवा कोणत्याही ओळखपत्र न दाखवता २ हजार रुपयांच्या १० नोटा एकावेळी बदलून घेऊ शकतात.
एसबीआयने जारी केलेल्या नियमावलीनुसार नागरिकांना एकावेळी १० नोटा बदलून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र सोबत बाळगण्याची अथवा बँकेत गेल्यावर ते दाखवण्याची गरज भासणार नाही. नोटा बदलून देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या अन्य सूचनात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे एसबीआयने म्हटले आहे.