
अमरावतीः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (एसएससी बोर्ड) इयत्ता दहावीच्या परीक्षेत अंजनगाव सुर्जी येथील एका परीक्षा केंद्रावर इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिकांचीच चोरी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन उत्तरपत्रिका कस्टडीत जमा न करता त्या एका खासगी इसमाकडे लपवून ठेवण्यात आल्याचे भरारी पथकाच्या तपासणीत निष्पन्न झाल्यानंतर उपशिक्षण अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून परिरक्षक, सहपरिक्षकासह पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आदेशानुसार इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. २७ फेब्रुवारी रोजी अंजनगाव सुर्जी येथील एका परीक्षा केंद्रावर अमरावती जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणअधिकारी (माध्यमिक) रजनी शिरभाते यांच्या नेतृत्वातील भरारी पथक दुपारी ४ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास पोहोचले. या दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर होता.
भरारी पथकाने परीक्षा केंद्राची तपासणी केली असता परीक्षा केंद्र व्यवस्थापनात मोठा गोंधळ आढळून आला. पेपर संपल्यानंतर उत्तरपत्रिका सील करण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे बंधनकारक असतानाही सायंकाळी उशिरापर्यंत उत्तरपत्रिका सील करण्यात आल्या नव्हत्या. भरारी पथकाने बारकाईने पाहणी केली असता परीक्षा केंद्रावरील अनिल हाडोळे नावाचा कर्मचारी संशयास्पद हालचाली करताना आढळून आला.
भरारी पथकाने अनिल हाडोळे थांबून त्याची तपासणी केली असता त्याच्या शर्टच्या आत लपवून ठेवलेल्या दोन उत्तरपत्रिका सापडल्या. त्यापैकी एक उत्तरपत्रिका इंग्रजी माध्यमाची तर दुसरी उत्तरपत्रिका उर्दू माध्यमाची होती. भरारी पथकाने त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. हा प्रकार घडला तेव्हा परीरक्षक सुधीर खोडे आणि सहपरिरक्षक सुशीलकुमार अभ्यंकर हे घटनास्थळी उपस्थित होते. परंतु त्यांनी कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही.
इयत्ता दहावी परीक्षेत पेपर संपल्यानंतर विहित वेळेत सर्व उत्तरपत्रिका कस्टडीत जमा करणे बंधनकारक असते. परंतु या प्रकरणातील आरोपींनी संगनमत करून दोन उत्तरपत्रिका कस्टडीत जमा न करता त्या एका खासगी इसमाकडे लपवून ठेवल्या. हा प्रकार करण्यामागे त्यांचा गैरहेतू असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी उपशिक्षणाधिकारी रजनी शिरभाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परिरक्षक सुधीर खोडे, सहपरिरक्षक सुशीलकुमार अभ्यंकर, खासगी इसम अनिल हाडोळे आणि अन्य दोन अज्ञात विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच सुधीर खोडे आणि अनिल हाडोळे या दोघांना अटक करण्यात आली आहे तर सुशीलकुमार अभ्यंकर हा फरार झाला आहे. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
