शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना मिळणार नवीन चादर, लोकरी ब्लँकेट, बेडशीट आणि सतरंजी; सामाजिक न्याय विभागाकडून ११ कोटींची खरेदी


मुंबईः सामाजिक न्याय विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींची वसतिगृहे, अनुसूचित जाती व नव बौद्ध मुला-मुलींच्या निवासी शाळांतील विद्यार्थ्यांना नवीन चादर, बेडशीट, सतरंजी आणि लोकरी ब्लँकेट मिळणार आहे. त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून ११ कोटी २५ लाख ९४ हजार ९३३ रुपयांची खरेदी करण्यात येणार आहे.

सामाजिक न्याय विभागांतर्गत राज्यातील मागासवर्गीय मुला-मुलींच्या शिक्षणासाठी शासकीय वसतिगृहे व अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या शिक्षणासाठी शासकीय निवासी शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत.

या शासकीय वसतिगृहे व निवासी शाळांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, बेडशीट, चादर, बॅरक कंबल (लोकरी ब्लँकेट) सतरंजी तसेच दैनंदिन खर्चासाठी निर्वाह भत्ता इत्यादी सोयीसुविधा देण्यात येतात.

या विद्यार्थ्यांना आता नवीन चादर, बेडशीट, सतरंजी, बॅरक कंबल (लोकरी ब्लँकेट) देण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला असून त्यासाठी नागपूर व मुंबई येथील महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ यांच्याकडून ५४ हजार ६५ चादर, ९२ हजार १९९ बेडशीट, ४२ हजार ९४५ लोकरी ब्लँकेट आणि ४१ हजार २६६ सतरंज्या खरेदी करण्यात येणार आहेत.

ही खरेदी करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून ११ कोटी २५ लाख ९४ हजार ९३३ रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय २७ जानेवारी रोजी जारी करण्यात आला आहे.

समाज कल्याण आयुक्तांच्या नियंत्रणाखाली ही खरेदी केली जाणार असून पुरवठादार संस्थांना पुरवठा करावयाच्या वस्तूंचे नमुने आधी समाज कल्याण आयुक्तांकडे सादर करून ते मंजूर करून घ्यावे लागणार आहेत. हे मंजूर केलेले नमुनेच शासकीय वसतिगृहांचे अधीक्षक/गृहपाल यांना दाखवून मालाचा पुरवठा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!