
मुंबई: राज्यातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचा सुमारे रक्कम २१६९ रुपये कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात ३१ मार्चपूर्वी जमा करण्यात येत आहे अशी माहिती कृषी मंत्री ऍड.माणिकराव कोकाटे यांनी दिली.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजना फेब्रुवारी २०१९ पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) २००० रुपये प्रतिहप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी ६००० रूपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी राज्यात सन २०२३-२४ पासून राबवण्यात येत आहे. या योजनेमध्ये पीएम किसान योजनेच्या प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी ६ हजार रुपयांच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन आणखी सहा हजार रुपयांची भर घालते. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकदा १२ हजार रुपये प्रतिवर्षी लाभ अदा करण्यात येत आहे.
आजअखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण ५ हप्ते वितरित करण्यात आलेले असून राज्यातील ९०.८६ लाख शेतकरी कुटुंबांना ८९६१.३१ कोटींचा लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात थेट जमा करण्यात आलेला आहे.
प्रधानमंत्री यांच्या हस्ते माहे डिसेंबर २०२४, ते माहे मार्च, २०२५ या कालावधीतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. या हप्ता वितरण सोहळयामध्ये राज्यातील एकूण ९२.८९ लाख शेतकरी कुटुंबाना रक्कम १९६७.१२ कोटी निधीचा लाभ वितरीत करण्यात आलेला आहे.
या व्यतिरीक्त त्यानंतरही केंद्र शासनाने पी.एम. किसान योजनेअंतर्गत एकूण ६५,०४७ लाभार्थींना लाभ दिला आहे. त्यानुसार राज्यातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहाव्या हप्त्याचा सुमारे २१६९ कोटी रुपये लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात दि. ३१ मार्चपूर्वी जमा करण्यात येत आहे, असे कोकाटे म्हणाले.