जालना जिल्ह्यात बस-टेम्पोच्या भीषण अपघातात ६ ठार, १८ जण जखमी


जालनाः जालना जिल्ह्यातील वडीगोद्री रोडवरील शहापूर गावाजवळ मोसंबीची वाहतूक करणारा आयशर टेम्पो आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात होऊन ६ जण ठार तर १८ जण जखमी झाले आहेत. अंबडपासून दहा किलोमीटर अंतरावर आज शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास झालेला हा अपघात एवढा भीषण होता की बस आणि टेम्पोचा चक्काचूर झाला आहे.

गेवराईकडून अंबडकडे जाणारी एसटी बस आणि विरुद्द दिशेने जालन्याकडून मोसंबी घेऊन जाणारा आयशर टेम्पो यांची समोरासमोर धडक झाली. बसमध्ये २४ प्रवाशी प्रवास करत होते. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्यांना अंबडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

दुसऱ्या वाहनाला मागे सारून पुढे जाण्याच्या घाईत टेम्पो समोरून येणाऱ्या बसवर जाऊन धडकला. त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातातील किरकोळ जखमींवर अंबडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू  असल्याचे सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!