मुंबईः लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वातील महायुतीचे नेते आणि उमेदवारांनी पैसे वाटल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केले जात आहेत. अशातच नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमधून नऊ बॅगा उतरवण्यात आल्या आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याबाबतचा व्हिडीओच त्यांनी समाजमाध्यमावर शेअर केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. मतदानाच्या आदल्यादिवशी महायुतीचे नेते आणि उमेदवारांनी विविध मतदारसंघांमध्ये मतदारांना पैसे वाटप केल्याचे आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आले आहेत. यापूर्वी तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या आदल्यादिवशी अजित पवार गटाने बारामतीत, शिवसेनेच्या शिंदे गटाने कोल्हापुरात आणि भाजपने साताऱ्यात पैसे वाटल्याचे आरोप करण्यात आले आहेत. पुरावे म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समाजमाध्यमांवर काही व्हिडीओही शेअर केले आहेत. त्यात आता खुद्द मुख्यमंत्र्यांवरच पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिकमध्ये हेलिकॉप्टरमधून उतरतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा कर्मचारी हेलिकॉप्टरमधून भल्या मोठ्या बॅगा घेऊन उतरत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या बॅगांमध्ये तब्बल १२ ते १३ कोटी रुपये भरून नाशिकमध्ये उतरले. तेथून ते पैसे एका हॉटेलमध्ये नेले. त्यांनी ते पैसे कुठे नेले आणि कुणाला दिले, याबाबतची माहिती मी लवकरच सर्वांसमोर मांडेन, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
एक्सवर (ट्विटर) हा व्हिडीओ शेअर संजय राऊतांनी खोचक शब्दांत हल्लाबोल चढवला आहे. ‘मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण! नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस…दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बँगा पोलिस का वाहात आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बँगा वाटप सुरू आहे,’ असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
समाजमाध्यमावर हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बातचीत केली. नाशिकमध्ये पैसे वाटण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री त्यांच्या हेलिकॉप्टरने तिकडे गेले होते. मुख्यमंत्री काल (१२ मे) बँगा भरून पैसे घेऊन नाशिकला आले होते. मुख्यमंत्री केवळ दोन तासांसाठी नाशिकमध्ये आले. त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये खूप जड बॅगा होत्या. पोलिसांना त्या आवरत नव्हत्या. त्यात काय होते? त्यात काही ५०० सूट किंवा ५०० सफाऱ्या होत्या का? मुख्यमंत्र्यांनी त्या बॅगा कोणत्या हॉटेलमध्ये नेल्या? तिथून ते पैसे कोणाला वाटण्यात आले? याची व्हिडीओ स्वरुपातील माहिती मी लवकरच सर्वांसमोर मांडणार आहे. ते पैसे मुख्यमंत्र्यांनी कोणाला दिले? कसे दिले? याची माहिती मी सर्वांना देणार आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
त्या बॅगा इतक्या जड होत्या की, त्या पोलिसांनाही आवरत नव्हत्या. मुख्यमंत्री कुठेही गेले तरी त्यांच्याकडे काय असते? फार-फार तर चार-पाच फाईली असतात. परंतु आता आचारसंहिता असल्यामुळे मुख्यमंत्री त्या फाईलवरही स्वाक्षरी करू शकत नाहीत. मग या ९ ते १० भल्या मोठ्या बॅगांमध्ये नेमके होते तरी काय? ते केवळ दोन तासांसाठी नाशिकमध्ये आले. एका हॉटेलमध्ये बॅगा उतरवल्या. त्या बॅगा त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचल्या, असा हल्लाबोलही संजय राऊतांनी चढवला आहे.
एका बाजूला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात की, सक्तवसुली संचालनालय (ईडी) खूप उत्तम काम करत आहे. खरेतर ही ईडी म्हणजे भाजपची गँग आहे. लुटांरूची टोळी आहे. राज्यात पैसे वाटप चालू असल्याचे त्यांना दिसत नाही. सीबीआय आणि प्राप्तिकर विभाग राज्यात भ्रष्टाचाराला पाठिंबा देत आहेत. सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार लपवत आहेत. निवडणूक काळात महाराष्ट्रात पैश्यांचा पाऊस पडत आहे. मी ठामपणे सांगतो की, या उन्हाळ्यात कितीही पाऊस पडू द्या, मोदींचा पराभव होणार आहे, हे नक्की. त्यांनी जर खरेच विकास केला असता तर त्यांच्यावर आज पैसे वाटण्याची वेळ आली असती का? नाशकातला व्हिडीओ त्याचा सर्वात मोठा पुरावा आहे, मी तो समाजमाध्यमावर शेअर केला आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून ९ ते १० बॅगा उतरवण्यात आल्या. त्या बॅगा पोलिसांना आवरत नव्हत्या. त्या नऊ-दहा बॅगांमध्ये काय होते? कोणी याचे उत्तर देऊ शकेल का? याचे उत्तर मी देतो. त्या बॅगांमध्ये किमान १२ ते १३ कोटी रुपये होते. ते पैसे मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी नाशकात उतरवले. मुख्यमंत्री ते पैसे घेऊन एका हॉटेलात गेले. तेथे त्यांनी संबंधित लोकांना ते पैसे वाटले. ते पैसे मतदारसंघामध्ये वाटण्यात आले. त्यातील काही इतर ठिकाणीही गेले. मी आता फक्त बॅगांचा व्हिडीओ शेअर केला आहे. ते पैसे हॉटेलमधून कुठे आणि कसे गेले? याबद्दल मी लवकरच सर्वांसमोर माहिती मांडणार आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
शिंदे गट म्हणतो, त्या बॅगात फक्त कपडे!
दरम्यान, संजय राऊत यांच्या आरोपांना शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आ. संजय शिरसाठ यांनी उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदेंकडे असणाऱ्या त्या बॅगात फक्त कपडे होते, असे शिरसाठ म्हणाले. कोणताही नेता असो, उद्धव ठाकरे असो अथवा शरद पवार. ते कोणत्याही कार्यक्रमाला जाताना त्यांच्याबरोबर कपड्यांच्या एक-दोन बॅगा घेऊन जातातच. कारण हे नेते गर्दीत जातात, लोकांना भेटतात. एखाद्या ठइकाणी शर्ट फाटणे किंवा खराब होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे त्याची पूर्वतयारी म्हणून हे नेते कपड्यांच्या एक-दोन बॅगा आपल्याबरोबर घेऊन जातात. कोणताही नेता एका ठिकाणाहून निघून दुसऱ्या ठिकाणी गेला तर दरम्यानच्या काळात कपडे खराब होतात. त्यामुळे हे नेते कपड्यांची काळजी घेतात, असे आ. शिरसाठ म्हणाले.
या निवडणुकीत महाविकास आघाडीचे काही खरे नाही, हे त्यांना कळून चुकले आहे. त्यामुळे एका बाजूला सांगायचे की हे लोक (महायुती) पैसे वाटत आहेत, राजकीय दबाव निर्माण करत आहेत, ईव्हीएममध्ये गडबड करत आहेत. ही सगळी त्यांची पुढची कारणे आताच तयार करून ठेवत आहेत, असेही आ. शिरसाठ म्हणाले.