मुंबईः शिवसेना ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार, १० माजी आमदार आणि काँग्रेसचे ५ आमदार लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. या पक्षप्रवेशाचा पहिला ट्रेलर उद्या शुक्रवारी पहिला ट्रेलर पार पडणार असल्याचेही सामंत यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. ही चर्चा सुरू असतानाच उदय सामंत यांनी केलेल्या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मी आधीही सांगितले होते की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात खिंडार पडण्यास सुरूवात होईल. त्याचा पहिला ट्रेलर उद्या (२४ जानेवारी) तुम्हाला पहायला मिळेल. ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार, काँग्रेसचे ५ आमदार आणि ठाकरे गटाचे १० माजी आमदार व असंख्य जिल्हाप्रमुख हे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये सामील होतील. त्याचा पहिला टप्पा म्हणून उद्या रत्नागिरीत पहिला पक्षप्रवेश होणार आहे, असे सामंत म्हणाले.
रत्नागिरीतील काही माजी आमदार हे ठाकरे गटाला सोडून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यानंतर मी कोल्हापूरमार्गे सांगलीला जाणार आहे. त्यानंतर सातारा आणि साताऱ्यानंतर पुणे असा पहिला टप्पा आहे. माझ्या नावाची बदमानी करणाऱ्यांना माझे आव्हान आहे की, त्यांनी आमच्या पक्षात येणाऱ्यांचे पक्षप्रवेश रोखून दाखवावेत. आता तुम्हाला उद्यापासून दररोज ठाकरे गटातून एक जण फुटल्याची बातमी पहायला मिळेल, असा दावा सामंत यांनी केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ राबवले जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून त्यांच्या या दौऱ्यात या ऑपरेशनवर चर्चा होणार का? असा सवाल विचारला जात आहे.