हिंगोलीः या ना त्या कारणाने नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकणारे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आ. बांगर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याला फोन करून इकडची लाईन तोडू नका, नाहीतर रट्टे देईन, अशा भाषेत उघड धमकी दिली आहे.
आमदार संतोष बांगर हे हिंगोलीतून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत. परंतु बंडखोरी करून तेही शिंदे गटात सहभागी झालेले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मंत्रालयातील पोलिस कर्मचाऱ्याला शिविगाळ केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे वाद निर्माण झाला होता. आता ते नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
थकीत वीज बिले असणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी हाती घेतली आहे. गावातील काही लोकांनी वीज कनेक्शन तोडल्याची तक्रार आ. बांगर यांच्याकडे केली. त्यानंतर आमदार बांगर यांनी लगेच महावितरणच्या कर्मचाऱ्याला फोन करून दमदाटी केली. इकडची लाईन तोडू नका, नाहीतर रट्टे देईन, अशा शब्दांत बांगर यांनी उघड धमकीच दिली. बांगर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कर्मचाऱ्यांना धमकावणे, शिविगाळ आणि मारहाण करणे असे अनेक आरोप त्यांच्यावर आहेत. यापूर्वी त्यांनी मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत कामगारांना जेवणाचे डबे पुरवणाऱ्या गोडाऊनच्या व्यवस्थापकाला मारहाण केली होती. पीक विम्याच्या मुद्यावरून त्यांनी कृषी अधीक्षकांनाही शिविगाळ केली होती. मंत्रालयातील पोलिस कर्मचाऱ्याला त्यांनी शिविगाळ केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता या नव्या वादाची भर पडली आहे.