मुंबई: मला आणि आदित्यला तुरूंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी अनेक डाव खेळले. माझ्या कुटुंबावर चालून आले. तरीही सगळे सहन करून मी उभा राहिलो. एक तर तू रहाशील किंवा मी राहीन, असा थेट इशाराच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.
मुंबईच्या वांद्रे येथील रंग शारदा सभागृहात शिवसेना ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांची बैठक झाली त्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना हा थेट इशारा दिला. अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष नाही, अधिकृत पक्षचिन्ह नाही, तरीही मी प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देऊ शकतो ते केवळ तुमच्या भरोश्यावर. त्यामुळे मूळ पक्ष कुणाचा? आणि पक्षचिन्ह कुणाचे? याविषयीचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेल तेव्हा लागेल, पण मशाल चिन्हाचा प्रचार घरोघरी जाऊन करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शाखाप्रमुखांना दिले.
यापूर्वी धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला द्या म्हणून आपण निवडणूक आयोगात गेलो होतो. आता मशाल हेच चिन्ह आम्हाला अधिकृतपणे द्या, म्हणून आपण निवडणूक आयोगात जाणार आहोत. मशालीशी साधर्म्य असलेले कोणतेही चिन्ह ईव्हीएमवर ठेवू नका, अशी मागणीही आपण निवडणूक आयोगाकडे करणार आहोत, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
भारतीय जनता पक्ष म्हणजे चोर कंपनी आहे. अनिल देशमुख यांनी नुकतेच माध्यमांसमोर सांगितले की, मला आणि आदित्य तुरुंगट टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कसे कसे डाव खेळले. म्हणजे हे लोक माझ्या घरावर चालून आले. परंतु हे सगळे सहन करून मी हिमचीने उभा राहिलो. असे सांगतानाच एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन, असा थेट इशाराच उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.
आपल्यातल्या लोकांना आमच्या पक्षात या म्हणून तिकडून फोन येत असतील. आपल्यातले काही नगरसेवक, माजी नगरसेवक तिकडे जात आहेत. ज्यांना जायचे असेल त्यांनी खुशाल जावे. इथे राहून दगाबाजी करू नये. जे राहतील त्यांना सोबत घेऊन लढू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.