छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): आज देशभरात ईद-ए-मिलादचा सण देशभरातील मुस्लिम बांधव साजरा करत आहेत तर उद्या (१७ सप्टेंबर) रोजी अनंत चतुर्दशीला हिंदू बांधव हर्षोल्हासाने गणपती बाप्पाचे विसर्जन करणार आहेत. सामाजिक सलोखा राखत हे दोन्ही सण साजरे केले जावेत, याची खबरदारी घेतली जात असतानाच शिवा ट्रस्ट या शैक्षणिक संस्थेने मात्र ऐन ईदच्या दिवशीच गणेश विसर्जनाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि या गणेश विसर्जनासाठी सर्व जाती-धर्माचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना हजर राहण्याची सक्ती केली आहे. गैरहजर राहणाऱ्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपये दंड सक्तीने वसूल केला जाईल, असा ‘फतवा’च जारी करण्यात आला आहे.
आज देशभरात ईद-ए-मिलाद हा मुस्लिमांचा आणि उद्या मंगळवारी अनंत चतुर्दशी हा हिंदूंचा सण लागोपाठ आला आहे. ईदनिमित्त आज सार्वजनिक सुट्टी आहे. महाराष्ट्रात मुंबई शहर व मुंबई उपनगरात मुस्लिम बांधवांच्या विनंतीवरून आजच्याऐवजी बुधवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून तेथील मुस्लिम बांधव बुधवारीच जुलूस काढणार आहेत. उद्या मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. हिंदू- मुस्लिम बांधवांमध्ये सामाजिक सलोखा टिकून रहावा, म्हणून सामंजस्याने दोन्ही समाज हे सण साजरे करत असतानाच छत्रपती संभाजीनगरातील (औरंगाबाद) शिवा ट्रस्टने मात्र एक वेगळाच फतवा जारी केला आहे.
भालगाव निपाणी येथे शिवा ट्रस्टचे शैक्षणिक संकुल आहे. या शैक्षणिक संकुलात गणपती बसवण्यात आला असून आज ऐन ईद-ए-मिलादच्या (१६ सप्टेंबर) दिवशीच शिवा ट्रस्टने गणपती विसर्जनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या गणेश विसर्जनासाठी सर्व जाती-धर्माचे विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी गणेश विसर्जनाला गैरहजर राहतील, त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार रुपये दंड आकारला जाईल, असा ‘फतवा’च शिवा ट्रस्टच्या अध्यक्षांच्या स्वाक्षरीने १५ सप्टेंबर रोजी काढण्यात आला आहे.
आज ईदच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी म्हणजेच १६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ते दुपारी १ वाजेपर्यंत महाविद्यालयाच्या वेळापत्रकाप्रमाणे तासिका आणि प्रात्यक्षिके राहतील. दुपारी २ ते सायंकाळी ५ यावेळात गणेश विसर्जन होईल. सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालायाने वाटप केलेले नवीन टी शर्ट तर सर्व प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित रहावे, असेही या फतव्यात फर्मावणअयात आले आहे.
ही सक्ती म्हणजे धार्मिक स्वातंत्र्यावर आघात
देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या इच्छेप्रमाणे एखाद्या धर्माचे अनुकरण व आचरण करण्याची, कोणत्याही धार्मिक समारंभात सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय घेण्याची मुभा आहे. त्यामुळे कोणालाही कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी सक्ती करता येत नाही. शिवा ट्रस्टच्या भालगाव निपाणी येथील शैक्षणिक संकुलात सर्वच जाती-धर्माचे विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत. त्यांना त्यांचे स्वतःचे असे धार्मिक स्वातंत्र्य आहे. याची जाणीव असतानाही शिवा ट्रस्टच्या अध्यक्षांनी गणेश विसर्जनासाठी हजर राहणे सर्वांना बंधनकारक करणारा फतवा जारी करून आणि गैरहजर राहिल्यास प्रत्येकी एक हजार रुपये दंड आकारून ‘तालिबानी’ खाक्या दाखव त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावरच हल्ला केला आहे. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासन यावर कोणती कारवाई करते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.