नवी दिल्लीः अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केल्यानंतर शरद पवार गटाला कोणते नाव आणि कोणते चिन्ह मिळणार? याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली होती. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाने सूचवलेल्या तीन नावांपैकी आज एका नावावर शिक्कामोर्तब केले असून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ असे शरद पवारांच्या नव्या पक्षाचे नाव असेल.
अजित पवार यांच्या नेतृत्वात काही आमदारांनी बंड करून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात फूट पडली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आणि दोन्ही गटांनी आपलाच गट खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केला होता.
दोन्ही गटाकडून युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर मंगळवारी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला बहाल केले होते. अजित पवार गटाला पक्ष आणि निवडणूक चिन्ह देतानाच निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवे नाव आणि निवडणूक चिन्ह निवडण्यासाठी बुधवार म्हणजेच ७ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंतची वेळ दिली होती. शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला तीन नावे सूचवली होती. त्यानंतर आयोगाने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरद पवार,’ ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार’ आणि ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- एस’ असे तीन पर्याय सूचवण्यात आले होते. या तीन पर्यायांपैकी दुसरा पर्याय म्हणजेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार’ निवडणूक आयोगाने मंजूर केला आहे. शरद पवार गटाला मिळालेले हे नाव आगामी राज्यसभा निवडणूक पार पडेपर्यंत वैध राहील, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणूक होईपर्यंत शरद पवारांचा गट याच नावाने ओळखला जाणार आहे.
‘वटवृक्ष’ मागितले निवडणूक चिन्ह
निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला पर्यायी निवडणुकांची मागणी करण्याची सूचनाही मंगळवारी निर्णय देताना केली होती. त्यानुसार शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे वडाचे झाड म्हणजे ‘वटवृक्ष’ या निवडणूक चिन्हाची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.