महायुतीकडून लढण्याचे स्वप्न भंगले, शांतिगीरी महाराज आता महाविकास आघाडीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार?


नाशिकः छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील वेरूळ मठाचे मठाधिपती शांतिगीर महाराज हे यंदा नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे शांतिगिरी महाराजांचे भाजपच्या नेतृत्वातील महायुतीच्या तिकिटावर ही निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगल्यानंतर आता ते महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची बातमी समोर येत आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शांतिगिरी महाराज यांनी घोषणा केली आहे. भाजपच्या नेतृत्वातील महायुतीकडून उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती. शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीसाठी भाजपमधील काही नेतेही आग्रही होते.

शांतिगिरी महाराजांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा छत्रपती संभाजीनगरमधून (औरंगाबाद) इच्छूक असलेले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराडही उपस्थित होते. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. श्रीकांत शिंदे यांच्या घोषणेमुळे शांतिगिरी महाराज नाराज झाले असून त्यामुळे त्यांनी आता महाविकास आघाडीच्या तिकिटावर नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येते.

शांतिगिरी महाराज यांना महायुतीत शिंदे गटाकडून उमेदवारी मिळेल, अशी त्यांच्या भक्त परिवाराची अपेक्षा होती. परंतु श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यामुळे महायुतीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवण्याचे शांतिगिरी महाराजांचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळे आता शांतिगिरी महाराजाकडून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्याचा पर्याय शोधला जात आहे.

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून शांतिगिरी महाराज उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत शांतिगिरी महाराजांच्या भक्त परिवाराची चर्चाही झाल्याचे माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. आता महाविकास आघाडीकडून शांतिगिरी महाराजांना उमेदवारी दिली जाते काय? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कोण आहेत शांतिगिरी महाराज?

शांतिगिरी महाराज हे छत्रपती संभाजीनगरजवळील (औरंगाबाद) वेरूळ येथील जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती आहेत. जनार्दन स्वामी उर्फ बाबा महाराज हे या मठाचे पहिले मठाधिपती होते. १९८९ मध्ये जनार्दन स्वामी यांचे निधन झाल्यानंतर २५ डिसेंबर १९८९ रोजी शांतिगिरी महाराज यांची या मठाचे उत्तराधाकिरी म्हणून नेमणूक करण्यात आली. शांतिगिरी महाराज यांनी आजन्म ब्रह्मचारी रहाण्याचे व्रत घेतलेले आहे.

मूळ नाशिक जिल्ह्यातील लाखलगाव येथील रहिवासी असलेल्या शांतिगिरी महाराज यांच्या मठाची कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. शांतिगिरी महाराज यांचे देशात ५५ ठिकाणी मठ आहेत. ९ ठिकाणी गुरूकुल आहेत. एकट्या वेरूळ येथील मठाकडे तब्बल २०० एकर जमीन आहे. त्यांच्याकडे फिरण्यासाठी एसयूव्ही, टाटा सफारीसारख्या महागड्या गाड्या आहेत.

शांतिगिरी महाराज यांचा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि जालना जिल्ह्यात मोठा भक्त परिवार आहे. २००९ मध्ये शांतिगिरी महाराज यांनी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभा निवडणूक लढवली होती परंतु या निवडणुकीत त्यांचा दणकून पराभव झाला होता. या निवडणुकीत त्यांना १ लाख ४८ हजार मते पडली होती. आता हेच शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातून पुन्हा लोकसभेवर जाण्यासाठी चाचपणी करत आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!