बीडः बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींचा खून झाल्याचा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या निषेधार्थ आज (२८ डिसेंबर) बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करा, अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया बीडमध्ये आल्या आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.
काल रात्री मला एका अनोळखी इसमाचा फोन आला. त्याने व्हॉट्सअप कॉलवर बोलण्याची विनंती केली. पण नेटवर्कमुळे व्हॉट्सअप कॉल कनेक्ट होऊ शकला नाही. त्यानंतर त्या अनोळखी इसमाने मला व्हॉईस नोट पाठवली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आता कधीच सापडणार नाहीत. कारण तीन आरोपींचा खून झाला आहे, अशी माहिती या इसमाने दिली, असा खळबळजनक दावा दमानिया यांनी केला आहे.
हे ऐकून मी हबकेल. ही माहिती मी बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांना दिली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकूण सात आरोपी आहेत. त्यापैकी तीन आरोपींचा खून झाल्याची माहिती या अनोळखी इसमाने दिली आहे. या तिघांचे मृतदेह कुठे पुरले याचीही माहिती या अनोळखी इसमाने दिली. या माहितीची मी खातरजमा केलेली नाही. फोन करणारा अनोळखी माणूस कोण आहे, याचीही मला माहिती नाही, असे दमानिया म्हणाल्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांचे जवळचे हितसंबंध असल्याचे पुरावेही त्यांनी सोशल मीडियावर उघड केले आहेत. धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज बीडमध्ये निघणाऱ्या मोर्चात सहभागी होणार नसल्याचे अंजली दमानिया यांनी जाहीर केले आहे. या मोर्चामध्ये सर्व राजकारणी मंडळी आहेत. या मोर्चात शरद पवार, जितेंद्र आव्हाड, सुरेश धस सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड काय चीज आहे, हे माहीत होते. पक्षात असताना त्यांना हे लोक चालत होते. आता पक्ष बदलल्यामुळे ते त्यांच्या विरुद्ध मोर्चे काढत आहेत, असे दमानिया म्हणाल्या.