‘सेक्युलर’ शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता नव्हे तर ‘सर्वधर्मसमभाव’, नितीन गडकरींनी केली नवीन व्याख्या; राजकीय वादाची शक्यता


नागपूरः आपल्या देशात ‘सेक्युलर’ शब्दाचा वराच प्रचार केला गेला. मधल्या काळात धर्माधर्मात वाद व्हावे म्हणून राजकीय मतांसाठी ‘सेक्युलर’ शब्दाचा वापर झाला. परंतु ‘सेक्युलर’ शब्दाचा अर्थ ‘धर्मनिरपेक्षता’ असा नसून ‘सर्वधर्मसमभाव’ असा आहे, असे म्हणत भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय संविधानातील ‘सेक्युलर’ शब्दाची नवीन व्याख्या सांगितली. गडकरींच्या या नव्या व्याख्येमुळे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असल्याचेही गडकरी म्हणाले.

माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या विदर्भातील आमदारांचा बुधवारी गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासह विदर्भातील भाजपचे आमदार उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी ‘सेक्युलर’ या शब्दाची नवीन व्याख्या सांगितली.

‘सेक्युलर’ या शब्दाचा अर्थ ‘धर्मनिरपेक्षता’ असा नसून ‘सर्वधर्मसमभाव’ असा आहे. शब्दकोषातही हाच अर्थ आहे. काही देशात युद्ध सुरू आहेत. आज सर्वांना बुद्धाची गरज आहे. जेवढा आदर आम्हाला भगवान श्रीरामांबद्दल आहे तेवढाच आदर भगवान गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त आणि अल्लाहबद्दलही आहे, असे गडकरी म्हणाले.

जावेद अख्तर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांची एकदा मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत हा देश ‘सेक्युलर’ रहायला नको का? असा प्रश्न वाजपेयी यांना विचारण्यात आला होता. त्यावर अटलजींनी उत्तर दिले की, हा देश ‘सेक्युलर’ आहे आणि कायमच सेक्युलर राहील. परंतु तो काँग्रेस, भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे नाही तर या देशातील हिंदू समाजामुळे सेक्युलर राहील. त्यांची सहनशीलता, सर्वसमावेशकता, संस्कृतीमुळे हा देश कायमच ‘सेक्युलर’ राहणार आहे, असे गडकरी म्हणाले.

हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू जीवनपद्धती यांच्याबद्दल अनेक समज आणि गैरसमज आहेत. परंतु भारतीयत्व हेच हिंदुत्व आहे व हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे, हा विचार अटलबिहारी वाजपेयी यांनी मांडला. हिंदुत्वाचा खरा अर्थ भारतीयत्वाशी निगडित आहे, असे गडकरी म्हणाले.  आमच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात शिवाजी महाराज किंवा महाराणा प्रताप यांनी मंदिर बांधण्यासाठी कधीही मशीद पाडली नाही.जात, पंथ, धर्माच्या पलीकडे जाऊन राज्याचा विकास करा, असा सल्ला गडकरी यांनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांना दिला.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *