साताराः न्यायव्यवस्थेवरील लोकांच्या विश्वासाला अजून तरी तडा गेला नसला तरी सातारा जिल्ह्यातील एक सत्र न्यायाधीशच लाचखोरीच्या जाळ्यात अडकला आहे. जामीन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी साताराचे जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह अन्य तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारातच लाच स्वीकारण्याचा हा प्रकार घडला.
सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल असलेल्या जामीन अर्जासाठी मदत करण्यासाठी आणि जामीन मिळवून देण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि इतर तीन जणांनी लाचेची मागणी केली असल्याची तक्रार पुणे येथील एका तरूणीने केली होती.
तक्रारदार तरूणीच्या वडिलांचा सातारा जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज आहे. त्या तरूणीच्या वडिलांना जामीन मिळवून देण्यासाठी आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता. माण) आणि किशोर संभाजी खरात (रा. वरळी, मुंबई) यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्याशी संगनमत केले आणि जामीन अर्जाबाबत मदत करण्यासाठी आणि जामीन मिळून देण्यासाठी या दोघांनी न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासाठी त्या तरूणीकडे पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. हे दोघेही न्या. धनंजय निकम यांचे मित्र असल्याचे सांगितले जाते.
तक्रार तरूणी आणि आनंद खरात व किशोर खरात आणि त्यांच्यासोबतच्या एका अनोळखी व्यक्तीची ३, ९ आणि १० डिसेंबर रोजी चर्चा झाली. त्यांनी १० डिसेंबर रोजी लाचेची पाच लाख रुपयांची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर या तिघांनी रक्कम गाडीत आणून द्या, असे सांगून लाचेची रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला. सातारा जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातच या सगळ्या घडामोडी घडल्या.
पुणे आणि सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संयुक्तपणे सापळा रचून न्या. धनंजय निकम यांच्यासाठी लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सातारा शहर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील कलमांन्वये न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.