मुंबईः बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचा मास्टरमाइंड म्हणवल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडवर अखेर मकोका लावण्यात आला असून केज न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वाल्मिक कराडला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा त्याच्या हातात बेड्या नव्हत्या. एक पोलिस वाल्मिक कराडच्या हाताला धरून असल्याचे छायाचित्र समोर आले आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या हातात बेड्या का नाहीत? वाल्मिक कराडच्या दहशतीमुळे पोलिसांनी त्याला बेड्या घातल्या नाहीत की मंत्री धनंजय मुंडेंच्या दबावामुळे? असा सवाल आता केला जात आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाबाबत भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे आणि आ. संदीप क्षीरसागर यांच्याखेरीज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. वाल्मिक कराड आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील आर्थिक हितसंबंधांचे पुरावेच अंजली दमानिया यांनी जाहीर केले आहेत. आता त्याच अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडच्या हातात बेड्या का नाहीत? असा गंभीर प्रश्न उपस्थित करणारा त्यांना प्राप्त झालेला संदेश ‘मला आलेल्या मेसेजमध्ये एका सामान्य नागरिकाच्या मनातील भावना’ असे म्हणत एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.
‘खंडणी (३०७), हत्या (३०२) संघटित गुन्हेगारी (मकोका) मध्ये गुन्हेगार असलेल्या, १४ दिवसांपासून आरोपी म्हणून तुरुंगात असणाऱ्या वाल्मिक कराडच्या हातात बेड्या का नाहीत? पोलिस वाल्मिक कराडला आरोपी/गुन्हेगाराची वागणूक न देता एखादी व्हीआयपी सुरक्षा दिल्यासारखी का दिसत आहे? गृह विभाग, पोलिस प्रशासन तसेच कायदेतज्ज्ञांनी सांगावे कराडच्या हातात बेड्या का नाहीत?’ असे सवाल या संदेशात करण्यात आले आहेत.
‘सारखेच गुन्हे असलेले घुले, चाटे, सांगळे यांना बेड्या घालून वागणूक आहे पण वाल्मिक कराडला नाही. कराडच्या हातात बेड्या न घालण्याचे कारण काय? वाल्मिकची दहशत की मंत्री धनंजय मुंडेंचा दबाव?’ असे सवालही या संदेशात करण्यात आले आहेत.
कराडच्या समर्थनार्थ परळीत ठिय्या आंदोलन
दरम्यान, वाल्मिक कराडला मकोका लावल्यानंतर त्याचे समर्थक आक्रमक झाले असून परळी पांगरी कॅम्पमध्ये कराड समर्थक रस्त्यावर बसून आंदोलन करत आहेत. त्याच ठिकाणी एक कार्यकर्ता टॉवरवर चढून आंदोलन करत आहे. वाल्मिक कराडवरील गुन्हे मागे घेतले नाही तर स्वतऋ टॉवरवरून उडी मारून आत्महत्या करणार, अशी धमकी त्याने दिली आहे. त्या परिसरातील नागरिकही रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करत आहेत.