कामाच्या अतिताणामुळे रोबोटने केली पायऱ्यांवरून उडी मारून आत्महत्या, दक्षिण कोरियातील खळबळजनक घटना!


सेऊलः कामाचा अतिताण, नैराश्य किंवा भावनिक पोकळी निर्माण झाल्यामुळे माणसाने आत्महत्या केल्याचे आपण नेहमीच ऐकतो, वाचतो. परंतु मध्य- दक्षिण कोरियातील एका नगरपालिकेत तैनात असलेल्या रोबोटने कामाचा ताण सहन न झाल्यामुळे पायऱ्यांवरून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या रोबोटने असे का केले? याच्या कारणांचा शोध घेण्यात येईल, असे गुमी शहर नगरपालिकेने म्हटले आहे.

वर्षभरापूर्वी हा रोबोट गुमी शहर नगरपालिकेत प्रशासकीय कामकाजात मदतीसाठी तैनात करण्यात आला होता. गेल्या आठवड्यात तो पाऱ्याखाली निष्क्रीय अवस्थेत आढळून आला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पायऱ्यांवरून उडी मारण्यापूर्वी हा रोबोट इकडे-तिकडे फिरत होता. त्याच्यात काही तरी गडबड असल्यासारखे वाटत होते. या घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे, असे गुमी शहर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या रोबोटचे सुटे भाग जमा करण्यात आले आहेत. ज्या कंपनीने हा रोबोट डिझाइन केला होता, त्या कंपनीकडून आता त्याचे विश्लेषण केले जाईल. या रोबोटच्या जाण्याबद्दल नगरपालिकेच्या अन्य एका अधिकाऱ्याने शोक व्यक्त केला. तो शहराच्या नगरपालिकेचा अधिकृतपणे भाग होता आणि तो आमच्यापैकीच एक होता, असे हा अधिकारी म्हणाला.

डेली मिररने दिलेल्या वृत्तानुसार, कॅलिफोर्नियातील बेअर रोबोटिक्स या कंपनीने हा रोबोट विकसित केला होता. हा रोबोट सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत काम करत होता. त्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे पब्लिक सर्व्हिस कार्डही होते.

हा रोबोट अन्य रोबोटपेक्षा खूपच वेगळा होता. अन्य रोबोट इमारतीच्या एकाच मजल्यावर काम करू शकतात. परंतु हा रोबोट एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर फिरू शकत होता. हा रोबोट लिफ्ट कॉल करू शकत होता आणि लिफ्टद्वारे तो या मजल्यावरून त्या मजल्यावर जात असे.

स्थानिक वृत्तपत्रांनी या रोबोटच्या आत्महत्येची बातमी प्रामुख्याने छापली आहे. ‘हा कष्टाळू लोकसेवकाने असे वर्तन का केले?’ असा सवाल काही वृत्तपत्रांनी केला आहे. तर ‘जे काम या रोबोटवर सोपवण्यात आले होते, ते त्याच्यासाठी खूपच कठीण होते,’ असे काही वृत्तपत्रांनी म्हटले आहे.

दक्षिण कोरिया रोबोटच्या आकर्षासाठी ओळखला जातो. जगातील सर्वाधिक रोबोट्स दक्षिण कोरियात आहेत. दक्षिण कोरियातील प्रत्येक दहा कर्मचाऱ्यांमागे एक रोबोट आहे, असे आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स फेडरेशनने म्हटले आहे.

माणसाने आत्महत्या करण्याच्या घटना सामान्य झाल्या आहेत. परंतु दक्षिण कोरियात घडलेल्या या घटनेमुळे आता रोबोटनेही आत्महत्या करण्यास सुरूवात केल्याचे समोर आले आहे. कामाच्या ताणामुळे एखाद्या रोबोटने आत्महत्या करण्याची ही जगातील पहिलीच घटना आहे.

माणसे एकमेकांशी आपले विचार शेअर करून मनमोकळे करू शकतात, परंतु रोबोटसाठी हे मार्ग बंद असतात. रोबोट भावनिक ओलावा निर्माण करू शकत नाही, त्यामुळे तर या रोबोटने आत्महत्या केली नाही ना? याची कारणे आता तपासली जातील.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!