नागपूर: ग्राम विकास विभागाची मार्च २०१९ आणि ऑगस्ट २०२१ मध्ये होणारी पदभरती प्रक्रिया रद्द करण्यात आली असून या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क संबंधित जिल्हा परिषदांमार्फत परत करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.
यासंदर्भातील प्रश्न सदस्य प्रा. राम शिंदे, प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, अभिजित वंजारी, डॉ.मनीषा कायंदे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी महाजन बोलत होते.
परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परतावा रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. तसेच उमेदवारांनी बँक खात्याची माहिती द्यावी. उमेदवारांकरीता बँक खात्याची माहिती भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली लिंक सुस्थितीत सुरू आहे.
उमेदवारांकडून मागणी प्राप्त झाल्यानुसार उर्वरित रक्कम अदा करण्यासाठी जिल्हा परिषदांना उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना वयाची अट शिथिल करण्यात आली असल्याची माहिती महाजन यांनी दिली.