‘पीईएस’चे अध्यक्ष रामदास आठवलेच, निर्णयावर राज्य सरकारचे शिक्कामोर्तब; राज्यातील सर्व विद्यापीठांना पाठवली आदेशाची प्रत


मुंबईः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ८ जुलै १९४५ रोजी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी अर्थात ‘पीईएस’चे अध्यक्ष रामदास आठवले हेच असल्याची मोहोर राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने उमटवली आहे. गेली अनेक वर्षे पीईएसच्या सदस्यपदावरून धर्मादाय आयुक्तांकडे वाद सुरू होता.

रामदास आठवले यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील कागदपत्रे माध्यमांना दिली. राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलसचिवांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पत्र पाठवले असून रामदास आठवले हेच पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष असून अन्य कोणत्याही व्यक्तींच्या शिफारशी विद्यापीठांनी स्वीकारू नयेत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्रासोबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या आदेशाची प्रत जोडण्यात आली आहे.

पीईएसच्या नियामक मंडळाच्या ठरावानुसार माझी पीईएसच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेली आहे. या ठरावाविरोधात पीईएसच्या वतीने काही लोकांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे धर्मादाय आयुक्तांकडे दावा दाखल केला होता. धर्मादाय आयुक्तांनी दोनवेळा भालचंद्र मुणगेकर आणि अशोक तळवटकर यांचा अर्ज फेटाळून लावला. धर्मादाय आयुक्तांनी ४ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या आदेशानुसार माझीच नेमणूक कायम केली, असे आठवले म्हणाले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ८ जुलै १९४५ रोजी मागास प्रवर्ग तसेच इतर सर्व जातीधर्माच्या मुलांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. या संस्थेच्या संचालक मंडळात ७ सदस्य मागास प्रवर्गातील आणि ४ सदस्य सवर्ण अशा प्रकारे सर्वसमावेशक रचना बाबासाहेबांनी केली होती. तीच रचना आम्ही कायम ठेवली आहे, असेही आठवले म्हणाले.

आनंदराज आंबेडकरांनी आता लुडबुड करू नये

आनंदराज आंबेडकर हे आमचे चांगले मित्र आहेत. त्यांनी आता पीपल्स एज्युकेशन सोसायटीत लुडबुड न करता आम्हाला बाहेरून सहकार्य करावे. आपण स्थापन केलेल्या कोणत्याही संस्थेत माझ्या घराण्यातील व्यक्तींचा समावेश असता कामा नये, अशी बाबासाहेब आंबेडकर यांची स्पष्ट भूमिका होती. त्यामुळे आता आनंदराज आंबेडकर यांनी आम्हाला बाहेरून सहकार्य करावे, असे आठवले म्हणाले. आता पीईएसमधील गटबाजीला आता पूर्णविराम मिळेल. राज्यातील सर्व जिल्ह्यात पीईएसची महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत. बाबासाहेबांनी पीईएसची स्थापना करताना जे ध्येय- उद्दिष्ट सुनिश्चित केले होते, तेच साध्य करण्यासाठी पीईएसचा अध्यक्ष या नात्याने मी कटिबद्ध आहे, असेही आठवले म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!