पुण्यातील खेड-शिवापूर टोलनाक्यावर इनोव्हा कारमधून ५ कोटींची रोख रक्कम जप्त, शहाजीबापूंचा ‘झाडी-डोंगरवाला’ कार्यकर्ता होता गाडीत!


पुणेः  ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पुणे- सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावर रोख रक्कम घेऊन जाणारी इनोव्हा क्रिस्टा कार राजगड पोलिसांनी ताब्यात घेतली असून या कारमधून तब्बल ५ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. राजगड पोलिसांच्या या कारवाईमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

पुणे- सातारा रस्त्याने एका वाहनातून मोठी रोख रक्कम घेऊन जाणार असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे राजगड पोलिसांनी सोमवारी दुपारपासूनच खेड-शिवापूर टोल नाक्यावर सापळा रचला होता. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास इनोव्हा स्क्रिस्टा हे संशयित वाहन टोल नाक्यावर आले. पोलिसांनी कारची तपासणी केली असता या कारमध्ये मोठी रोख रक्कम आढळून आली. पोलिसांनी ही कार पोलिस चौकीत आणून त्यातील रोख रक्कम ताब्यात घेतली. या वाहनातून चार जणांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यत आले आहे.

टोल नाक्यावर मोठ्या रोख रकमेसह जप्त केलेल्या इनोव्हा क्रिस्टामध्ये असलेल्या चार व्यक्तींची नावे सागर पाटील, रफीक नदाफ, बाळासाहेब आसबे आणि शशिकांत कोळी अशी आहेत. या चार जणांच्या नावांची नोंद पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

आ. शहाजीबापूंचा ‘झाडी-डोंगरवाला’ कार्यकर्ता कारमध्ये

पोलिस स्टेशनमध्ये ज्या चार जणांच्या नावाची नोंद करण्यात आली आहे, त्यातील रफिक नदाफ या व्यक्तीनेच शिंदेसेनेचे सांगोल्याचे आ. शहाजीबापू पाटील हे बंड करून गुवाहटीला गेले होते, तेव्हा त्यांना कॉल केला होता. त्याच्याशी बोलताना आ. शहाजीबापू पाटील ‘काय झाडी, काय डोंगर’ असे म्हणाले होते. त्यानंतर हा डॉयलॉग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि प्रसिद्धही झाला होता. सोशल मीडियावर तर रिल्सही तयार करण्यात आल्या होत्या. चार जणांपैकी सागर पाटील हा शहाजीबापू पाटील यांचा नातेवाईक असल्याची माहितीही समोर आली आहे.

नोटा मोजता मोजता पोलिसांची दमछाक

इनोव्हा क्रिस्टा वाहनातून जप्त करण्यात आलेल्या नोटा मोजण्याचे काम सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या नोटा मोजताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. जप्त करण्यात आलेल्या नोटा खऱ्या की खोट्या याबाबत पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

पंचनामा केल्यानंतर ही रक्कम मोजण्यात आली. एकूण पाच कोटींची रोख रक्कम आहे. ती रक्कम इन्कम टॅक्स विभागाला पुढील चौकशीसाठी देण्यात आली आहे. त्यांनी चौकशी केली असता जप्त करण्यात आलेल्या रकमेतील सर्व नोटा खऱ्या आहेत, असे पोलिसांनी सांगितले. पकडण्यात आलेली गाडी मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. या प्रकरणात काही राजकीय कनेक्शन आहे का, याबाबत आम्ही तपास करत आहोत, असेही पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले.

१० कोटी सोडून दिले, ५ कोटीच जप्तः राऊत

शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी या नोटा जप्ती प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. पुण्यातील खेड-शिवापूर भागात दोन गाड्या होत्या. त्यामध्ये १५ कोटी रुपये होते. तुम्हाला माहिती असेल की मी आधीच म्हटलं होतं की, एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा ५०-५० कोटी रुपये देण्याचे काम करत आहेत. त्यातील हा १५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता होता. जी गाडी पकडली त्यामध्ये सांगोल्याच्या आमदारांसाठी पहिला हप्ता जात होता. त्यामध्ये ५ कोटींचा हिशेब लागला. त्यातील १० कोटी सोडून देण्यात आले. एक फोन आला, त्यानंतर एक गाडी सोडून देण्यात आली, असा आरोप राऊत यांनी केला आहे.

अजून चार गाड्या कुठे आहेत?-रोहित पवारांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी या नोटा जप्तीवरून सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडले आहे. ‘सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इन्स्टॉलमेंट म्हणून प्रत्येकाला २५ कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातीलच एक गाडी खेड-शिवापूरच्या डोंगार झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत?’, असा सवाल आ. पवार यांनी केला आहे.

लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ओके करून डोंगर दऱ्या बघडण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार हे नक्की आहे. कारण महाराष्ट्र आहे, गुजरात नाही, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!