पुणेः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य महापुरूषांबद्दल केलेल्या अपमानास्पद व आक्षापार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ विविध पक्ष संघटनांकडून आज पुणे बंदची हाक देण्यात आली असून पुणेकरांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, विविध संघटनांकडून राज्यपालांच्या निषेधार्थ मूकमोर्चाही काढण्यात आला आहे. पुण्यातील डेक्कन गरवारे पुलावरील संभाजीराजे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरूवात करण्यात आली आहे.
महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरुद्ध विविध राजकीय आणि सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. व्यापारी संघानेही या बंदला पाठिंबा दिला आहे. राज्यपालांच्या वक्तव्यावरून व्यापारी संघटनाही आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत.
विविध व्यापारी संघटनांनीही या बंदला पाठिंबा दिल्यामुळे पुण्यातील मार्केट यार्ड बंद आहे. लक्ष्मी रस्त्यासह शहरातील सर्व दुकानेही दुपारी तीन वाजेपर्यंत राहणार आहेत. बंदच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने सार्वजनिक बस वाहतूक सेवा बंद ठेवली आहे. हॉटेल्सही बंद आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार ठप्प आहेत.
पुणे बंदची हाक देण्यात आल्यामुळे राज्यातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची पुणे कृषी उत्पन्न बाजर समितीही बंद ठेवण्यात आली आहे. येथे पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत असतो. एरवी गजबजलेली असणाऱ्या या बाजार समिती मात्र आज बंदमुळे शुकशुकाट आहे.
या बंदबरोबरच मूकमोर्चाही काढण्यात आला आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसलेही या मोर्चात सहभागी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी बंद आणि मोर्चाच्या दरम्यान अपमानास्पद घोषणांबर बंदी घातली आहे. संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात सुमारे साडेसात हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मूकमोर्चात मुस्लिम बांधवही हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर घेऊन सहभागी झाले आहेत. लहान मुले छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत या मोर्चात सहभागी झाली आहेत.