थेट जनतेतून निवडून आलेल्या नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांना सदस्यत्व आणि मताचाही अधिकार


मुंबईः नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये थेट जनतेतून निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व आणि मताचा अधिकार देण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या  मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असलेली व्यक्ती अध्यक्ष म्हणून निवडून येण्यास पात्र असते. त्यामुळे एखादी व्यक्ती अध्यक्ष म्हणून आणि त्याचवेळी सदस्य म्हणून निवडून येऊ शकते आणि दोन्ही पदावरही निवडून येऊ शकते. अशा व्यक्तीला दोन्ही पदांसाठी जनादेश मिळालेला असतो. म्हणूनच सदस्यांमधून अध्यक्ष म्हणून निवडून आलेली व्यक्ती सदस्य राहते आणि त्याचबरोबर अध्यक्ष व सदस्य म्हणूनही काम करते.

थेट जनतेतून निवडून आलेल्या आणि सदस्यांमधून निवडून आलेल्या अध्यक्षास जनादेश असतोच. त्यामुळे या सुधारणेनुसार आता अध्यक्ष म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती आणि सदस्य म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती एकाचवेळी दोन्ही पदे धारण करू शकते, अशी सुधारणा करण्यात येणार आहे.

या दुरूस्तीमुळे नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या नगराध्यक्षांना सदस्य म्हणून एक मत देण्याचा अधिकार मिळणार आहे. अशा व्यक्तीला अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून एक मत देण्याचा अधिकार असेल आणि मतांची बरोबरी झाल्यास, अध्यक्षाला निर्णायक मत देण्याचा अधिकार राहणार आहे, अशी सुधारणा या अधिनियमात केली जाणार आहे. त्याबाबतचा अध्यादेश काढण्यास मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!