राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले शिंगणापुरातील शनैश्वर मूर्तीचे दर्शन, चौथऱ्यावर जाऊन मूर्तीस केला तैलाभिषेक!


अहमदनगर: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शनिशिंगणापूर येथे शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेत पूजा केली. यावेळी राष्ट्रपतींनी श्री शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला.

यावेळी राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री  (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.

राष्ट्रपतींचे शनैश्वर मंदिरात आगमन झाल्यावर त्यांनी शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले व उदासी महाराज मठात त्यांनी अभिषेकही केला.

अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री विखे पाटील यांनी राष्ट्रपतींचा सत्कार केला. शनिशिंगणापूर संस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर, उपाध्यक्ष विकास बनकर, कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदळे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शनिदेवाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला.

चौथऱ्या जाण्यास महिलांना होती बंदी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्या चौथऱ्यावर जाऊन शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेक केला आणि दर्शन घेतले, तेथे पूर्वी महिलांना प्रवेश करण्यास बंदी होती. अनेक वर्षांपासून हा नियम होता. त्याविरोधात अनेकदा महिला संघटनांनी आंदोलने केली. मात्र २०१५ मध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन निर्णायक ठरले. या आंदोलनानंतर देवस्थानने हा चौथरा सर्वांसाठी खुला केला.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *