छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): जुने औरंगाबाद आणि सध्याचे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रात की गुजरातेत? असा प्रश्न तुम्हाला कुणी विचारला तर तुमचे उत्तर महाराष्ट्रात असेच असेल. परंतु महानगरपालिकेच्या लेखी छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रात नसून चक्क गुजरातमध्ये आहे. तशा छापील पावत्याच ऑनलाइन मालमत्ता करभरणा करणाऱ्या नागरिकांना दिल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका गुजरातेत पळवण्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत की काय? अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.
५२ दरवाजांचे शहर अशी ओळख असलेल्या औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यात यावे, अशी जुनी मागणी होती. कोर्टकज्जे करता करता अखेर औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यात आले आहे. हे नामांतर करण्यात आल्यानंतर औरंगाबाद महानगरपालिकेसह सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या दफ्तरी ‘छत्रपती संभाजीनगर’ अशी अधिकृत नोंद करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन दफ्तरातही छत्रपती संभाजीनगर असा बदल नोंदवण्यात आला आहे. मात्र हा बदल नोंदवताना भलताच घोटाळा झाला असून ऑनलाइन मालमत्ता कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांना दिल्या जाणाऱ्या पावत्या वाचून धक्केच बसत आहेत.
खरे तर मालमत्ता कराचा ऑनलाइन भरणा केल्यानंतर दिल्या जाणाऱ्या पावत्यांवर ‘छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका’ अशी नोंद यायला हवी. परंतु ही नोंद तशी न येता चक्क ‘गुजरात संभाजीनगर महानगरपालिका’ असा मजकूर मुद्रित केलेल्या पावत्या नागरिकांना मिळू लागल्या आहेत.
नूतन कॉलनीतील रहिवाशी सतीश संपतलाल सुराणा यांनी १ सप्टेंबर रोजी मालमत्ता कराचा ऑनलाइन भरणा केला. सिल्लेखाना जी २ येथून त्यांनी हा करभरणा केल्यानंतर जी ऑनलाइन पेमेंटची पावती मिळाली, त्यावर चक्क ‘गुजरात संभाजीनगर महानगरपालिका’ अशी नोंद असल्याचे वाचून त्यांना धक्काच बसला.
मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्रात होऊ घातलेले अनेक प्रकल्प गुजरातला पळवण्यात आल्यामुळे मोठे राजकीय काहूर माजले होते. गुजरातच्या या हडेलहप्पीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडल्या होत्या. तो वाद शांत होत नाही तोच आता महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर हे ऐतिहासिक शहरही गुजरातला पळवण्याचा घाट घातला जात आहे की काय? अशी शंका महानगरपालिकेच्या ऑनलाइन दफ्तरी करण्यात आलेल्या नोंदींमुळे घेतली जाऊ लागली आहे.
Vikas ki baat nahi sirf name chanage karne main govramnat pareshan h