मुंबईः नवी मुंबईतील खारघरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात उष्माघातामुळे ११ जणांचे बळी गेले आहेत. या घटनेचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळातही उमटत असून भर उन्हाळ्यात दुपारच्या वेळेला या कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी टिकास्त्र सोडले आहे. भरदुपारी कार्यक्रमाचे आयोजन टाळले असते तर ११ निष्पाण जणांचे मृत्यू टाळता आले असते. राजकीय शक्तिप्रदर्शनाची ही हौस ११ जणांच्या जीवावर बेतली, अशी टिकाही केली जात आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी रात्री उशिरा उष्माघाताचा फटका बसलेल्या लोकांची रूग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर हल्लाबोल केला. खरेतर कार्यक्रमाची वेळ उन्हाळ्यात भर दुपारची निवडणे हेच आयोजकांचे चुकले. आपल्यातले निष्पाप लोक मृत्युमुखी पडले आहेत, असे अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार फार महत्वाचा आहे. पण हलगर्जीपणा झाल्यामुळे काय घडू शकते, हे आजच्या घटनेतून पहायला मिळाले. महत्वाच्या कार्यक्रमाला गालबोट लागले. एक काळा डाग त्यावर बसला आहे. अजूनही नेमके किती लोक मृत्युमुखी पडले, हा आकडा समोर येत नाही. उद्धव ठाकरेंच्या काळात मुख्यमंत्री आम्हाला सांगायचे की, कोरोनाचा कोणताही आकडा लपवायचा नाही. जे घडले, ती वस्तुस्थिती लोकांना सांगायची. आता एमजीएम पनवेल, एमजीएम वाशी, डीवायपाटील, टाटा रुग्णालय अशा वेगवेगळ्या रुग्णालयात रुग्ण आहेत, असे अजित पवार म्हणाले.
वेळच चुकलीः मुळात त्यांची वेळ चुकली. वेळ संध्याकाळची असती तर अधिक योग्य झाले असते. कारण संध्याकाळी उन्हाची तीव्रता कमी राहते. एप्रिल-मेमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊच नयेत. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे. त्यांच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक येतात. ती काळजी घ्यायला हवी होती, असे पवार म्हणाले.
राजकीय शक्तिप्रदर्शनाची हौस टाळली असती तर…
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही कार्यक्रमाच्या आयोजनावरून सरकावर टिकास्त्र सोडले आहे. भर उन्हाळ्यात दुपारी कार्यक्रम घेण्याची काय गरज होती, असा सवाल त्यांनी केला आहे.
खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला भर उन्हात बसलेल्या नागरिकांपैकी ८ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे.या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि अत्यवस्थ अशलेले नागरिक लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना करतो, असे ट्विट त्यांनी केले आहे.
या घटनेच्या निमित्ताने एक प्रश्न पडतो की, ऐन उन्हाळ्यात भरदुपारी एवढा मोठा कार्यक्रम घेण्याची गरज होती का? हे टाळता आले नसते का? मूळात राजकीय शक्तिप्रदर्शनाची हौस टाळली असती तर एका चांगल्या कार्यक्रमाला आज गालबोट लागले नसते आणि निष्पाप बळी गेले नसते. हा पूर्णतः सरकारचा बेजबाबदारपणा आहे, असे टिकास्त्रही रोहित पवार यांनी सोडले आहे.