नवी दिल्लीः तुम्ही महामार्ग किंवा एक्सप्रेस वेवर वाहन चालवत असाल तर यापुढे तुम्हाला पहिल्या २० किलोमीटरपर्यंत कोणताही टोल भरावा लागणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम (जीएनएसएस) असलेल्या खासगी वाहनांना पहिल्या २० किलोमीटरपर्यंत टोलमधून सूट देण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम २००८ मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने दुरूस्ती केली आहे. या दुरूस्तीअन्वये जीपीएस आधारित टोल प्रणालीला मंजुरी देण्यात आली आहे. ज्या वाहनांमध्ये जीपीएस प्रणाली असेल त्या वाहनांना आता टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी थांबण्याची गरज नाही आणि अशा वाहनांना फॉस्टॅग लावण्याचीही गरज नाही.
नवीन जीपीएसआधारित टोल प्रणालीमध्ये आता केवळ वाहनांच्या नंबर प्लेटच्या मदतीनेच टोल कापला जाईल. महामार्गावर जेवढे किलोमीटर वाहन चालवण्यात येईल, तेवढा टोल कापला जाईल. याच दुरूस्तीमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने जीएनएसएस प्रणालीने सुसज्ज असलेल्या खासगी वाहनांना महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर पहिल्या २० किलोमीटरपर्यंत टोलमधून सूट दिली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मंजुरी दिलेली नवीन सॅटेलाइट आधारित टोल प्रणाली ही जीएनएसएस तंत्रज्ञानावर आधारित आहे. या जीपीएस प्रणालीद्वारे वाहनांचे नेमके लोकेशन कळते. त्यामुळे जीएनएसएस प्रणालीने सुसज्ज असलेल्या वाहनांना आता महामार्ग किंवा एक्सप्रेस वेवर जेवढे किलोमीटर प्रवास केलेला असेल, तेवढाच टोल द्यावा लागेल. या वाहनांना टोल नाक्यावर थांबण्याचीही गरज नाही की, फास्टॅग लावण्याचीही गरज नाही. नवीन जीएनएसएस तंत्रज्ञानावर आधारित असलेली टोल प्रणाली ही फास्टॅग आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन प्रणालीपेक्षा वेगळी आहे.
टोलनाक्यावर वेगळी लेन
जीएनएसएस प्रणालीचे ऑनबोर्ड यूनिट (ओबीयू) असलेल्या वाहनांना टोलनाक्यावर स्पीड कमी करण्याची किंवा थांबण्याचीही गरज भासू नये म्हणून टोलनाक्यावर या वाहनांसाठी वेगळी लेन करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. वाहनांमध्ये बसवलेले ओबीयू महामार्गांवरील हालचालींचा मागोवा घेईल आणि हा डेटा सॅटेलाइटला पाठवेल. त्यामुळे प्रवास केलेल्या अंतराची नेमकेपणाने गणना केली जाईल. महामार्गावरावर बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे वाहनांच्या लोकेशनची अचूकता पडताळून पाहिली जाईल.
…तर दुप्पट टोल वसुली
जीएनएसएस प्रणालीचे ऑनबोर्ड यूनिट (ओबीयू) असलेल्या वाहनांसाठी महामार्ग आणि एक्सप्रेस वेवरील टोलनाक्यावर स्वतंत्र लेन असेल. या लेनमध्ये जर ओबीयू नसलेली वाहने आल्यास अशा वाहनांकडून दुप्पट टोल टॅक्स वसूल केला जाईल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
तुमच्या वाहनात कसे बसवाल ओबीयू?
फास्टॅगप्रमाणेच ओबीयू केंद्र सरकारच्या पोर्टलवर उपलब्ध असेल. ते वाहनांमध्ये बाहेरून इन्स्टॉल करावे लागेल. वाहन उत्पादक कंपन्याही ओबीयू प्री-इन्स्टॉल केलेल्या वाहनांचीही ऑफर देतील. काही ओबीयू थेट टोल किती झाला, याचे कॅल्क्युलेशन करतील तर काही ओबीयू केंद्रीकृत प्रणालीकडे प्रक्रियेसाठी डाटा पाठवतील.
फास्टॅग प्रणालीचा अंत?
सध्या देशातील बहुतांश वाहनचालकांना फास्टॅगद्वारे झटपट टोल पेमेंट करण्याची सवय झाली आहे. सध्या फास्टॅग प्रणाली वापरात आहे. नवीन जीएनएसएस आधारित टोल प्रणाली सुरूवातीला काही महत्वाचे महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर सुरू करण्यात येईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर ही प्रणाली सुरू केली जाईल. ज्या वाहनांना ओबीयू नाही, त्यांना ते सरकारी पोर्टलवरून मिळवणे फास्टॅग मिळवण्याइतकेच सहज सोपे असेल.