पुणेः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही. अजित पवार हे आमच्याच पक्षाचे नेते आहेत, असा बॉम्बगोळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत ३० ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीच्या सहा दिवस आधीच फोडला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘इंडिया’ आघाडीची महत्वाची बैठक येत्या ३० ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. या बैठकीची तयारी सुरू असतानाच सुप्रिया सुळे यांचे हे वक्तव्य आले आहे. राज्यात एक उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत. दुसरे कुठले आहेत? कुठल्या पक्षाचे आहेत? मला माहिती नाही, असेही खा. सुळे म्हणाल्या.
आमचा पक्ष अजून एकच आहे. पक्ष फुटलेला नाही. एक गट सत्तेत आहे तर एक गट विरोधी पक्षात आहे. अजित पवार आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पहात आहोत, असे खा. सुळे म्हणाल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली. त्याबाबत विचारले असता आम्ही गुप्त बेठक करत नाही. चोरडिया यांच्या घरी गुप्त बैठक का होईल? असा सवाल त्यांनी केला आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत खा. सुळे यांनी भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’वर भाष्य केले. भाजपने तीनवेळा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आले. यावेळी मात्र भाजपला ते शक्य झाले. त्यांना काहीही करून सत्तेत यायचे आहे. साम, दाम, दंड, भेद असे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच म्हटले आहे, असे खा. सुळे म्हणाल्या.
शरद पवार चारवेळ राज्याचे मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यापासून त्यांनी एकदाही विधानसभा निवडणूक लढवली नाही. इंडिया आघाडीतील सगळे लोक शरद पवार यांना नेता मानतात. आमचे आमदार पवारांच्याच नेतृत्वात निवडून येतात. अनेकवेळा आमचा पक्ष राज्यात नंबर एकवर राहिलेला आहे, असेही सुळे म्हणाल्या.