विधान परिषदेच्या पाचही मतदारसंघात शिंदे गटाचा उमेदवारच नाही, नाशिकमध्ये ‘राजा का बेटा’विरुद्ध ‘सामान्य मुलगी’त थेट लढत


मुंबईः महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या  पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आज दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती. या दरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. मात्र सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसमधून बंडखोरी केलेले सत्यजीत तांबे विरुद्ध शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत होईल, असे चित्र स्पष्ट झाले आहे. शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार असतील, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यामुळे ‘राजा का बेटा’ विरुद्ध ‘सामान्य मुलगी’ अशी रंगतदार लढत होण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे या पाच मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात शिंदे गटाचा उमेदवार उभा नसल्याचेही आज स्पष्ट झाले आहे.

विधान परिषदेच्या नागपूर, कोकण आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ आणि नाशिक व अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी वेगाने घडल्या. शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीने शिंदे-फडणवीसांना धक्का देत आपले स्वतंत्र उमेदवार उभे करण्याची घोषणा केली. त्यानंतर काँग्रेसने एबी फॉर्म देऊनही नाशिकमधून विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारीच दाखल न केल्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आणि नाशिकच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले.
नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देऊनही त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. दुसरीकडे त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या निवडणुकीच्या राजकारणात वेगळाच ट्विस्ट आला. सत्यजित तांबेंच्या विजयासाठी भाजपकडून पडद्यामागून जोरदार हालचाली करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार धनंजय जाधव यांनी भाजप नेते गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सांगण्यावरून माघार घेतली.

 नाशिक पदवीधर मतदारसंघ

या मतदारसंघातील उमेदवार शुभांगी पाटील या आज सकाळपासूनच नॉटरिचेबल होत्या. शुभांगी पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याची चर्चा सुरू होती. शुभांगी पाटील आपला अर्ज मागे घेतील, अशी अफवाही पसरली होती. मात्र शुभांगी पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही.

नाशिकमधून आज सहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. एकूण १६ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे नाशिकमध्ये आता सत्यजित तांबे, शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत होईल. शुभांगी पाटील यांनी शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न केले. आता त्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार असतील, अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. विद्यमान आमदार विक्रम काळे यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा उमेदवारी दिली आहे. विक्रम काळे हेच या मतदारसंघातून या आधीच्या दोन टर्म आमदार राहिले आहेत. त्याआधीचे त्यांचे वडिल वसंत काळे हेही या मतदारसंघाचे अनेक वर्षे आमदार राहिले आहेत. या मतदारसंघात भाजपने काँग्रेसमधून आयात केलेले किरण पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. विक्रम काळे यांचा दांडगा जनसंपर्क आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थात्मक जाळे यामुळे विक्रम काळे यांना ही निवडणूक फारशी अवघड जाणार नाही, अशी शक्यता आहे.

नागपूर शिक्षक मतदारसंघ

या निवडणुकीच्या निमित्ताने नागपूर शिक्षक मतदारसंघातही अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या मतदारसंघातून गंगाधर नाकाडे यांना उमेदवारी जाहीर केली मात्र गंगाधर नाकाडे यांनी आपला अर्ज उमेदवारी मागे घेऊन टाकला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश इटकेलवार यांनी अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंतही त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलाच नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार नागो गाणार आणि काँग्रेसचे सुधाकर आडबोले यांच्यातच थेट लढत होईल.

अमरावती पदवीधर मतदारसंघ

अमरावती पदवीधर मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला देण्यात आली आहे. या मतदारसंघात काँग्रेसने धीरज लिंगाडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार आणि विदयमान आमदार रणजित पाटील हे मैदानात आहेत. या मतदारसंघात लिंगाडे आणि पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. ही लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

कोकण शिक्षक मतदारसंघ

कोकण शिक्षक मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे नेते विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. ते यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कोकणच्या शैक्षणिक क्षेत्रात शेकापचा असलेला दबदबा आणि बाळाराम पाटील यांचा जनसंपर्क यामुळे ही निवडणूक भाजपला म्हणावी तितकी सोपी जाणार नाही.

३० जानेवारीला मतदान, २ फेब्रुवारीला निकाल

 नाशिक, अमरावती पदवीधर आणि औरंगाबाद, नागपूर, कोकण शिक्षक मतदारसंघात येत्या ३० जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी मतदानानंतर तीन दिवसांनी म्हणजेच २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतदान असल्यामुळे निकाल हाती यायला बराच उशीर लागणार आहे. या पाच मतदारसंघातून बाजी कोण मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!