नवी दिल्लीः मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्याचे युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांचे स्वप्न राजधानी दिल्लीतही साकार होणार आहे. दिल्लीतील ३०० पेक्षा जास्त आस्थापना २४ तास सुरू ठेवता येणार आहेत. यामध्ये रेस्टॉरंट्सपासून मेडिकलची दुकाने, परिवहन सेवा, बीपीओ आणि ऑनलाइन डिलिव्हरीचा समावेश आहे. या श्रेणीतील दुकानांनी २४ तास सुरू ठेवण्याच्या परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर त्यांना पुढील आठवड्यापासून परवानगी दिली जाणार आहे.
दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी ३१४ आस्थापनांना २४ तास सुरू ठेवण्याची सूट देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामधील काही प्रस्ताव २०१६ पासून प्रलंबित होते. आता उपराज्यपालांनी दिलेल्या निर्देशांनुसार यासंबंधीची अधिसूचना सात दिवसांच्या आत जारी करावी. या निर्णयानंतर मोठ्या शहरांमध्ये प्रचलित असलेल्या ‘नाइट लाइफ’ संस्कृतीलाही चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे. यामध्ये ट्रान्सपोर्ट ट्रॅव्हलसह अनेक केपीओ आणि पीबीओचाही समावेश करण्यात आला आहे.
रोजगाराच्या संधी आणि सकारात्मक वातावरण निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या आशेने दिल्ली शॉप्स अँड इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट १९५४ च्या कलम १४, १५ आणि १६ अंतर्गत सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सूट मिळण्यासाठी आस्थापना ऑनलाइन अर्ज करू शकतात. खरे तर महिला किंवा तरूणांना रात्री ९ ते सकाळी ७ यावेळेत दिल्लीत काम करण्यास सांगितले जाऊ शकत नाही, असे याच्याशी संबंधित कायद्याच्या कलम १४ मध्ये असे म्हटले आहे.
त्याचवेळी या कायद्याच्या कलम १५ नुसार, आस्थापना उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ निश्चित करण्याचा अधिकार राज्य सरकारला बहाल करण्यात आला आहे. १९९५ मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार दिल्लीतील आस्थापनांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली होती. कलम १६ मधील तरतुदींनुसार प्रत्येक आठवड्याला एक दिवस आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.
२००४ मध्ये यात बदल करण्यात आले आणि दुकाने बंद करण्याची वेळ रात्री ११ वाजेपर्यंत वाढवून देण्यात आली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत २७ जानेवारीपासून नाइट लाइफ सुरू करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती. रोजगार निर्मिती आणि लोकांना २४ तास सेवा मिळावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे तेव्हा आदित्य ठाकरे म्हणाले होते.