छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): महाराष्ट्रात गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून राज्यातील अकृषि विद्यापीठे आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयात पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापकांची भरतीच करण्यात आली नसल्यामुळे राज्यातील नेट, सेट, पीएच.डी.धारकांना अत्यंत तुटपुंज्या मानधनावर संसार चालवणे मुश्लिक झाले आहे. अनेकदा मोर्चे, आंदोलने, उपोषणे करून थकलेल्या या बेरोजगारांची सहनशीलता आता संपली आहे. त्यामुळे २५ सप्टेंबरपर्यंत १०० शंभर टक्के प्राध्यापक भरतीचा शासन निर्णय जारी करा, अन्यथा २५ सप्टेंबर रोजी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मूळगावी म्हणजेच सातारा जिल्ह्यातील दरे येथे सामूहिक आत्मबलिदान करू, असा इशारा नेट-सेट, पीएच.डी. धारक संघर्ष समितीने दिला आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे आले असता नेट-सेट, पीएच.डी. धारक संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन हा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रात गेली १२ वर्षापासून प्राध्यापक भरती सुरळीतपणे सुरू नाही. राज्यातील अकृषी विद्यापीठे व अशासकीय अनुदानित महाविद्यालयामध्ये ३११८५ पदे (२०१७ च्या वर्कलोड व आकृतीबंधानुसार) प्राध्यापकांची आवश्यकता असताना केवळ २०११८ प्राध्यापक कार्यरत असून राज्यात ११०६७ प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंबलबजावणी व शैक्षणिक गुणवत्तेसाठी राज्यात प्राध्यापकांची कमतरता आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग व वित्त विभाग तसेच उच्चस्तरीय अधिकार समिती यांच्या अनागोंदी कारभारामध्ये राज्यातील उच्चशिक्षित बेरोजगारांची पिढी भरडली जात आहे. महाराष्ट्र शासनाला तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाला या संदर्भात यूजीसीने देखील वारंवार परिपत्रके देऊन प्राध्यापक भरती करण्यासाठी वेळोवेळी जाणीव करून दिली आहे, याची आठवणही या निवेदनात देण्यात आली आहे.
नेट-सेट. पीएचडी धारक संघर्ष समितीने याकरिता अनेक निवेदने, उपोषणे , सत्याग्रह आंदोलने, मोर्चा, पदयात्रा, वारी, भेटी, बैठका यामार्फत न्याय मागण्याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु तो यशस्वी झाला नाही, अशी खंतही या निवेदनात बोलून दाखवण्यात आली आहे.
सर्वाचा विचार करणारा मुख्यमंत्री म्हणून आपणाकडून आम्हास मोठ्या अपेक्षा आहेत. ज्यांनी आम्हाला हाडाची काडं करून शिक्षण दिले त्या आमच्या बहीण, भाऊ, पत्नी व आई-वडिलांच्या किमान आशा-अपेक्षा देखील आम्ही पूर्ण करू शकलो नाहीत. आम्ही सनदशीर मार्गाने अनेक प्रयत्न केले पण आपल्यातर्फे आम्हास न्याय मिळत नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.
आम्ही वारंवार पाठपुरावा करून हताश झालो आहोत, थकलो आहोत. आता शेवटचा पर्याय म्हणून आपण २५ सप्टेंबर २०२४ च्या अगोदर १०० टक्के प्राध्यापक भरतीचा शासन निर्णय काढा अन्यथा २५ सप्टेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्याच्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे या मूळ गावी सकाळी ११ वाजता सामूहिक आत्मबलीदान करणार आहोत. सामूहिक आत्मबलिदानाचा निर्णय आम्ही सदसदविवेकबुद्धीने घेतला आहे, असे सांगतानाच आमच्या आत्महत्येला ही निष्क्रिय व्यवस्था जबाबदार असेल. आमच्या विनाशाला राज्याचे प्रमुख म्हणून आपण स्वतः जबाबदार असाल, असेही या निवेदनात म्हटले आहे.
प्रत्येक जिल्ह्यातून निवेदन आणि सुसाईड नोट
नेट-सेट, पीएच.डी. धारक संघर्ष समितीच्या वतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, सर्व विभागीय सहसंचालक यांनाही निवेदनाची प्रत पाठवून सामूहिक आत्मबलिदानाची परवानगी मागण्यात आली आहे. या निवेदनासोबत त्या-त्या जिल्ह्यातील नेट-सेट, पीएच.डी. धारक त्यांची सुसाईड नोटही जोडून देत आहेत.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनावर डॉ. प्रमोद तांबे, डॉ. कांचन जोशी, डॉ. विश्वास देशमुख, डॉ. रमेश वाघमारे, डॉ. प्रवीण गोळे, प्रा. विकास गवई, प्रा. ओंकार कोरवले, डॉ. देवानंद गोरडवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.