मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे बंडाच्या तयारीत असून भाजपसोबत जाऊन एकनाथ शिंदेंच्या ऐवजी मुख्यमंत्री बनवण्याच्या त्यांचा प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ आमदारांपैकी ४० आमदारांनी अजित पवारांना आपल्या स्वाक्षरीनिशी पाठिंब्याचे पत्र दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांनी दिली. हा सर्व घटनाक्रम पाहतात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधीच एकनाथ शिंदेंना डिच्चू देऊन त्यांच्या जागी अजित पवार हे मुख्यमंत्री झालेले पहायला मिळू शकतात.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेले १६ आमदार सर्वोच्च न्यायालयाकडून अपात्र ठरवले जाण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे एकनाथ शिंदेंच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमधील ४० आमदारांनी अजित पवारांना आपल्या स्वाक्षरीनिशी पाठिंब्याचे पत्र दिल्याचे वृत्त ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हा सगळा घटनाक्रम घडत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी धारण केलेली निरव शांतता ही या सगळ्यात मनोरंजक बाब आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना त्यांच्या पाठिंब्याच्या स्वाक्षरीसाठी व्यक्तिशः फोन करून संपर्क साधत आहेत आणि त्यांच्याकडून पाठिंब्याची पत्रे मिळवत आहेत. पाठिंब्याची ही पत्रे योग्यवेळ आल्यानंतर राज्यपालांकडे सादर केली जातील, असे सूत्रांनी सांगितले.
शरद पवारांच्या मौनामुळे सगळेच बुचकळ्यात
पक्षात एवढे सगळे घडत असताना शरद पवार यांनी अजित पवारांच्या या खेळीला अटकाव करण्यासाठी अद्याप कोणतीही प्रतिखेळी खेळलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते बुचकळ्यात पडले आहेत.
२०१९ मध्ये अजित पवारांनी बंड केल्यानंतर शरद पवारांनी पक्ष एकसंध ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांशी संपर्क साधला होता, असे असल्याचे ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात म्हटले आहे.
शरद पवार यांनी अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराला फोन केलेला नाही, त्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटते. मात्र शेवटच्या क्षणी शरद पवार हे हस्तक्षेप करून बाजी पलटवू शकतात, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
पुण्यातील सोमवारचे नियोजित कार्यक्रम रद्द करून अजित पवार आपल्या विश्वासू सहकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मुंबईतच थांबले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर या एकूणच घटनाक्रमाला कलाटणी मिळेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अपक्ष आमदार रवि राणा यांनी म्हटले आहे.
असा आहे एकनाथ शिंदेंना डिच्चूचा प्लॅन
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर अथवा कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच एकनाथ शिंदेंना पायउतार करण्याच्या पर्यायांची सध्या भाजपकडून चाचपणी सुरू आहे. हा बदल सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधीच व्हायला हवा, असा सल्ला काही कायदेतज्ज्ञांनी दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधीच अजित पवारांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यास नवीन सरकार पडणार नाही आणि भाजपचेही फारसे नुकसान होणार नाही, असा त्यामागचा तर्क आहे. गोष्टी मागे पुढे जात आहेत. आम्हाला अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितल्याचे ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात म्हटले आहे.
जुन्या-जाणत्या नेत्यांचाही अजितदादांच्या बंडाला पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेसमधील जुने-जाणते आणि शरद पवारांचे अत्यंत विश्वासू नेत्यांचाही अजित पवारांच्या या बंडाला पाठिंबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे नेते शरद पवारांच्या कृपेने कायम सत्तेच्या परिघात वावरत राहिले, तेच नेते आता शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या बंडात सामील होण्याच्या तयारीत आहेत. अजित पवारांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० आमदार गेले तर शरद पवारांसोबत अवघे १३ आमदार उरतील. त्यामुळे उतारवयात पक्षात होऊ घातलेली ही पडझड शरद पवार कशी रोखणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.