मुंबईः ठाण्यातील व्हिव्हीयाना सिनेमागृहात सोमवारी रात्री हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी रात्री १० वाजता या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. आ. आव्हाड यांच्या अटकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सोमवारी रात्री व्हिव्हीयाना सिनेमागृहात हर हर महादेव चित्रपटाचा शो सुरू झाल्यानंतर या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रेक्षकांना सिनेमागृहातून बाहेर जाण्याचे आवाहन केले होते. त्यानंतरही सिनेमागृहात बसून राहिलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावले होते. त्यावेळी किरकोळ वादावादीही झाली होती. त्यात एका प्रेक्षकाला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेण्यात आले आणि नंतर अटक करण्यात आली.
जितेंद्र आव्हाड यांनीच फेसबुक पोस्ट करून याबाबतची माहिती दिली. ‘ आज दुपारी साधारण १ वाजता मला वर्तकनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाही तर तुम्ही पोलिस स्टेशनला या, असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. परंतु मी चांगुलपणाने म्हटलं की मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवले. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले की, मी काही करू शकत नाही. वरून आदेश आले आहेत. तुम्हाला अटक करावी लागेल. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल, पण मी जे केलेले नाही तो गुन्हा मी कबूल करणार नाही,’ असे आ. आव्हाड यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
हर हर महादेव चित्रपटाचे शो बंद पाडणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, प्रेक्षकांना मारहाण करणे अशा विविध कारणांवरून आ. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणी आज जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे.
…तर ही लढाई पूर्ण ताकदीने लढू- खा. सुप्रिया सुळेः राष्ट्रवादी काँग्रेसकडून जितेंद्र आव्हाडांच्या अटकेचा तीव्र निषेध केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी आपली भूमिका मांडली आहे. आम्हा सर्वांना या कामासाठी जेलमध्ये जावे लागले तरी चालेल पण छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. या कामासाठी जितेंद्र आव्हाड यांना अटक होत असेल तर त्यांचा आम्हाला अभिमान आहे, असे खा. सुळे म्हणाल्या. या प्रकरणात सरकारने उत्तर दिले पाहिजे की, राज्य सरकार नेमके कोणाच्या बाजूने आहे? जर सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात असेल तर ही लढाई पूर्ण ताकदीने लढू असा इशाराही खा. सुळे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
जितेंद्र आव्हाड यांचा नेमका गुन्हा कोणता?- जयंत पाटीलः महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करणाऱ्यांविरोधात जितेंद्र आव्हाड अथवा इतर लोकांमद्ये जी संतापाची लाट उसळली. त्यामुळे राज्य सरकार खजील झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने जितेंद्र आव्हाड यांच्यावर राग काढायला सुरूवात केली आहे. राज्य सरकारच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या बाजूने दिसत नाही. जितेंद्र आव्हाड यांनी नेमका कोणता गुन्हा केला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामी विरोधात लढणे हा आजच्या महाराष्ट्रात गुन्हा झाला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील- मिटकरीः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एकनाथ शिंदे सरकारला गंभीर इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक करून या सरकारने परत एकदा या राज्यात हुकुमशाही नांदते आहे याचा प्रत्यय करून दिल्याबद्दल सरकारचे धन्यवाद! मूठभर ‘खोप्या’तील ‘देशी’ गुंडांच्या नादाला लागून सरकारने ज्या पद्धतीने प्रकार केलाय त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील, असे ट्विट आ. मिटकरी यांनी केले आहे.
भाजपकडून स्वागत, भातखळकर म्हणाले, ‘जित्याची खोड…’ भाजपने मात्र या अटकेचे समर्थन केले आहे. जितेंद्र आव्हाडांना अटक ही अत्यंत योग्य आणि स्वागतार्ह कारवाई असल्याचे भाजप नेते अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. राज्यात कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही. कायद्याप्रमाणे वागावे लागेल, हे आव्हाडांनी लक्षात ठेवावे. सार्वजनिक ठिकाणी जाऊन गोंधळ घालणे, लोकांना मारहाण करणे योग्य नाही. चित्रपटावर आक्षेप होता तर सेन्सॉर बोर्ड किंवा पोलिसांकडे तक्रार करता आली असती. पण स्वतः लोकप्रतिनिधी असताना कायदा हातात घेणे ही आव्हाडांची जुनी खोड आहे, असे भातखळकर म्हणाले. ‘जित्याची खोड पोलिसांचे दंडुके पडल्याशिवाय जात नाही’ अशा शेलक्या भाषेत त्यांनी ट्विटही केले आहे.